‘मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख कोणाकडे ?

मुंबई : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील वातावरण सध्या तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री एक पत्रकार परिषद घेतली होती. मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांनी सरकारच्या संयमाची परीक्षा पाहू नये. जरांगे यांनी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करु नये. असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होत.

दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी सकाळी सुरु झाली.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या आवारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओत नाना पटोले यांनी खेळीमेळीत, ‘हे काय चाललंय?’, असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनी तात्काळ म्हटले की, ‘मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच.’ यावर नाना पटोले यांनी म्हटले की, मला सांगा, तुम्ही त्याला वाढवलं ना? त्यावर शिंदे यांनी, ‘तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होते’, असे म्हणत काढता पाय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने असल्याची चर्चा आता रंगली आहे.