छत्रपती संभाजी नगर : स्वतःचा पक्ष सांभाळला जात नसताना ते जागा वाटप कशी करणार ? महा विकास आघाडीतील सर्व पक्षांचे स्वतंत्र फॉर्म्युले आणि सगळ्याचे छुपे अजेंडे असल्याने आघाडी फार काही टिकणार नाही, असे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील यांनी केले आहे.
वैजापूर तालुक्यातील झोलेगाव इथं मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांच्याहस्ते घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे मोफत पास वितरीत करण्यात आले. यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, जागा वाटपाबाबत आमच्यात वाद नसून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. महा विकास आघाडीला जागा वाटपाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यांच्याकडे रोजच वज्रमुठ तयार होते आणि तिला तडे जात असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. शिंदे-फडवणीस सरकार आल्याने निर्णय झपाट्याने घेतले जात आहेत. मागील सरकारचे मुख्यमंत्री केवळ फेसबुकवर बोलायचे असा टोला उध्दव ठाकरेंचे नाव न घेता लगविला.
आमदार रमेश बोरणारे यांच्या कामाचे कौतुक केले. बोरणारे राज्यातील कर्तव्यदक्ष आमदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाळूची अवैध वाहतूक प्रकरणात आमचेच तहसीलदार हफ्ते घेत असल्याने याची आम्हाला लाज वाटते. शासकीय वाळू डेपोत अधिकारी व वाळू ठेकेदार अडथळा आणत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पण सरकार ठाम आहे. थोडा वेळ लागेल. जे आडवे येतील त्यांना आम्ही सरळ करू, असा इशाराच त्यांनी वाळूमाफियांना दिलाय.