महसूल विभागाचे दुर्लक्ष, कारवाईची गरज; वाळूमाफियाची हिंमत वाढली

जळगाव : अवैध वाळू उपसा गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बांभोरी पुलानजिक दिवसाढवळ्या अवैध वाळूची वाहतूक होत आहे. महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतुकीबाबत कारवाई करीत असले तरी तोकडीच आहे. कारण वाळू चोरट्यांनी दिवसाढवळ्या अवैध वाळू वाहतुकीचे धाडस केल्याने महसूल प्रशासन नेमकं करतंय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

अवैध वाळू उपसासंदर्भात यापूर्वीही कारवाया झाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा तोच प्रकार सुरू झाला. यासंदर्भात महसूल यंत्रणेकडून तत्पर कारवाई होण्याची गरज आहे. वाळूचा ठेका देण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरात बांधकामासाठी अवैध वाहतुकीच्या माध्यमातून येणारी वाळू उपलब्ध होते. शिवाय वाळूच मिळत नसल्याने घर बांधकामासाठी ती अवैधरित्या उपलब्ध होणारी वाळू संबंधित घर बांधकाम करणाऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने विकत घ्यावी लागत आहे. गिरणा नदीपात्रातून अवैध उपसा वाढल्याने नदीपात्रात वाळू उपसा झालेले खड्डे नजरेस पडतात.

 सोमवारी चालकावर कारवाई 

सोमवारी रात्री तहसीलदारांसह महसूल पथकाने वाळू डंपरवर कारवाई केली. मात्र डंपरचालक वाळू सोडून डंपर घेऊन पसार झाला. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या या डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्याचे होणार असल्याचे तहसीलदार अर्पित चव्हाण यांनी सांगितले. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाईचे सत्र सुरू राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसापासून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. सोमवारी रात्रीही अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली. पुढील काळात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

 – अर्पित चव्हाण, तहसीदार, जळगाव