महाराष्ट्रातील कांदळवन येथील निसर्गभिंतीला तडे…

कांदळवने… समुद्र किंवा खाडीकिनार्‍यावर वसलेली आणि किनार्‍यांची एक संरक्षक भिंत म्हणून खंबीरपणे उभी असलेली एक नैसर्गिक परिसंस्था. किनारा आणि समुद्र यांच्या सीमेवर असलेली ही परिसंस्था दुर्मीळ, नेत्रदीपक आणि विपुल अशी. ‘कार्बन सिक्वेसट्रेशन’मध्ये महत्त्वाची भूमिका तसेच अनेक प्रजातींचे अधिवास स्थान असलेली ही परिसंस्था अत्यंत महत्त्वाची.

कांदळवने ही वादळ, पूरस्थिती, त्सुनामी, समुद्राची वाढती पातळी तसेच जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण करतात. नैसर्गिक आणि महत्त्वाचे म्हणजे, सागरी परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही कांदळवने आता धोक्यात आली आहेत. जगभरातील तीन चतुर्थांश कांदळवनांचा भाग आता धोक्यात असण्याची शक्यता आहे, असे दर्शविणारा अहवाला आता समोर आला असून, कांदळवन परिसंस्थेतील प्रजातींनाही मोठा धोका निर्माण झालेला दिसतो.

‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरा (आययुसीएन) च्या नुकत्याच झालेल्या जागतिक मूल्यांकनामध्ये ही बाब समोर आली असून, यामध्ये ५० टक्के कांदळवनांना धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले आहे. परिसंस्थेच्या भागामध्ये असलेल्या मानवी क्रियाकलापांमुळे, मानवी हस्तक्षेपामुळे तसेच हवामान बदलामुळे कांदळवनांना धोका निर्माण झाला. जंगलतोड, विकासकामे, प्रदूषण, धरण बांधणे यांसारख्या क्रियांमुळे कांदळवनांना थेट धोका निर्माण झाला. त्याचबरोबर हवामान बदलामुळे तीव्र वादळांची वाढती वारंवारता, समुद्राच्या पातळीत झालेली वाढ यांसारख्या गोष्टी त्यांना नामशेष होण्याचा धोका निर्माण करतात. ‘आययुसीएन’ची ‘रेड लिस्ट ऑफ इकोसिस्टीम’ वापरून परिसंस्थेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी रस्त्यालगतच्या कांदळवनांचे मोजमापाचे साधन म्हणून प्रथमच मूल्यांकन करण्यात आले आहे.

परिसंस्थेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी ‘आययुसीएन रेड लिस्ट’ हे जागतिक मानक म्हणून पाहिले जात आहे. ‘आययुसीएन कमिशन ऑन इकोसिस्टीम मॅनेजमेंट’, ‘आययुसीएन स्पिशीज सर्व्हायव्हल कमिशन’ आणि ‘ग्लोबल मॅन्ग्रोव्ह अलायन्स’ यासह विविध संस्थांमधील २५० हून अधिक तज्ज्ञांसह ४४ देशांमधील ३६ प्रदेशांमध्ये हे मूल्यांकन केले गेले आहे. दक्षिण भारत, श्रीलंका, मालदीव आणि उत्तर पश्चिम अटलांटिकमधील कांदळवनाच्या परिसंस्था गंभीरपणे धोक्यात आलेल्या म्हणून ओळखले गेले, तर अगुल्हास, मध्य पॅसिफिक, पूर्व कोरल त्रिकोण, पूर्व मध्य आणि दक्षिण पूर्व ऑस्ट्रेलियन शेल्फ, लाल समुद्र, एडनचे आखात आणि दक्षिण चीन समुद्रालगतची कांदळवने धोक्यात आली आहेत.

जगभरातील सुमारे १५ टक्के किनारपट्टीवर म्हणजेच प्रामुख्याने जगभरातील उष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय आणि उष्ण समशीतोष्ण किनारपट्टीवर ही कांदळवने परिसंस्था लाख ५० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेली दिसते. या परिसंस्थेचे जैवविविधता संवर्धनासाठी तर महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर स्थानिकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठीही काम करतात. या अहवालातील मूल्यांकनानुसार, २०५० पर्यंत आत्ता परीक्षण केलेल्या ५० टक्के परिसंस्थांंपैकी सर्वच असुरक्षित, संकटग्रस्त किंवा गंभीरपणे धोक्यात असलेल्या प्रजाती असे वर्गीकरण करण्यात आले आहे, तर त्यापैकी साधारण २० टक्के मूल्यमापन केलेल्या कांदळवनांना सर्वाधिक धोक्याच्या वर्गात ठेवण्यात आले आहे, तर हवामान बदलामुळे प्रभावित होऊन कांदळवन परिसंस्थेतील जवळपास ३३ टक्के कांदळवन परिसंस्था धोक्यात आल्या आहेत.

अशाप्रकारे कांदळवनांचा विनाश जवळ आला असल्यास ही पर्यावरणाच्या आणि एकूणच सागरी परिसंस्थेबरोबरच इतरही परिसंस्थांना धोका निर्माण होणार आहे. जगभरातील अर्ध्याहून अधिक कांदळवने नष्ट झाल्यास त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जावा लागेल, तर वृक्षांची वाढ झाली तरीही तेथील जैवविविधता पुन्हा येण्यासाठी यापेक्षा ही अधिक कालावधी लागू शकतो. किनार्‍याची संरक्षक भिंत म्हणून उभ्या असलेल्या या कांदळवनांना आता संवर्धन आणि संरक्षणाची गरज भासते आहे. त्यामुळे कांदळवनांच्या संवर्धनासाठी एकत्र न आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, हेच खरे!