मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांसाठी आतापर्यंत सवलत योजना आणल्या आहेत. नुकतेच सर्व गटातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50 टक्के सवलत योजना सुरू केली. या योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आता परिवहन महामंडळाने सहा महिने मोफत प्रवासाची योजना आणली आहे.
एसटीतर्फे कर्मचाऱ्यांना सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात सहा महिन्यांचा पास मिळणार आहे. हा कालावधी एसटीचा ऑफ सिझन कालावधी असतो. त्यामुळे या काळातच ही सवलत घेता येणार आहे. त्यासोबतच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या ७५ वर्षांपर्यंत, तर मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला ६५ वर्षांपर्यंत सहा महिने घेता येणार आहे. म्हणजेच त्यांना सहा महिने मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. यासंदर्भात महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी परिपत्रक काढले आहे.
कोण कोण ठरणार पात्र
महामंडळाच्या योजनेते सेवानिवृत्त झालेले, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचारी पात्र ठरणार आहे. तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना मोफत प्रवास पास दिली जाणार आहे.