अमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर 20 आणि 21 फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर मृद आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यावेळी परीक्षा केंद्रांवर असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला होता.
मृद व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियंता पदाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यात 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते. तर सदर भरती प्रक्रिया ही टीसीएस मार्फत घेण्यात आली होती. परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.