नंदुरबार : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील आदिवासी विकासासाठी झटत असून विविध प्रकारच्या योजना लागू केलेल्या आहेत. शासनाच्या त्या योजनांचा प्रत्येक दुर्गम गावापर्यंत आम्ही लाभ पोहोचवत आहोत. आदिवासींना शंभर टक्के घरे देऊ. एक पण बाकी ठेवणार नाही. सर्व समाजातील बचत गटांना आणि लोकांनाही सहाय्य देऊ. आदिवासी बचत गटात प्रत्येकी 10 हजार सहाय्य देणार आहोत. मागाल ते देतो. बघू कोण थकतो. मार्च नंतर मागाल त्याला गाय, बकऱ्या, कोंबडी, गोठे सगळे देऊ, असे भरीव आश्वासन महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिले.
नंदुरबार आणि तळोदा येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने शेळी गट निवड पत्र वितरणासाठी घेण्यात आलेल्या बचत गटाच्या महिला सदस्यांच्या पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. नंदुरबार येथील मेळाव्यात आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत 16 गटांना शेळी गट निवड पत्र आणि एका कंपनी गटाला प्रक्रिया उद्योगासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे तळोदा येथेही 31 बचतगटांना शेळी गट निवडपत्र आणि काही मत्स्य व्यवसाय संस्थांना आणि कंपनीला कोटी रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी आणि खासदार डॉ. हिना गावित यांनी प्रत्येक महिलेला स्वबळावर उभे करण्याचे आमचे ध्येय आहे असे सांगून उपस्थित महिलांना उज्वला गॅस जल जीवन मिशन, हर घर जल योजना हर घर बिजली वगैरे योजनांचे महत्त्व समजावून सांगितले. घरात साठवलेल्या कांद्याची पावडर बनवण्या सारख्या नव्या उद्योग व्यवसायांची उभारणी
महिला करू शकतात आणि म्हणून मोदी सरकारने विविध योजना दिल्या आहेत त्याला ना. डॉ.विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या निधीची जोड दिली आहे त्याचा लाभ आपल्या भागातील महिलांनी घ्यावा, असे आवाहन खा. डॉ. हिना गावित यांनी केले. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले,की, आधार, रेशनकार्ड, पॅनकार्ड, सर्व आदिवासी विकास विभाग देतो. तुम्हाला कशाचाही खर्च नाही.