नवी दिल्ली : माझ्याकडे मोठ्या योजना आहेत. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कुणाला घाबरवण्यासाठी किंवा दडपण्यासाठी नाहीत. ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत घेतली आहे. ईडीने नोंदवलेले बहुतांश खटले अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत, ज्यांचा राजकारणाशी काहीही – संबंध नाही. प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याचे कारण नाही, परंतु भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना त्यांच्या पापाची भीती वाटू लागली आहे, असे मोदी यांनी सांगितले.
मी तिसऱ्या टर्मची तयारी सुरू केली आहे. सुरुवातीच्या १०० दिवसांची योजना तयार आहे. माझ्या भाषणांमध्ये मी २०२४ नाही, तर २०४७ हे लक्ष्य नमूद करतो. जेव्हा देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर अमृत महोत्सव साजरा करीत होता, त्याच वेळी मी हा विषय सर्वांसमोर ठेवायला सुरुवात केली. २०४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील. साहजिकच असे टप्पे असतात, ते एक प्रकारे माणसाला नवा उत्साह आणि नवीन निर्धाराने भारावून टाकतात, असे मोदी यांनी सांगितले.
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’चा देशाला फायदा
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर मोदी म्हणाले, ही आमची वचनबद्धता आहे. अनेक लोकांनी समितीला त्यांच्या सूचना दिल्या आहेत. अनेक सकारात्मक आणि नावीन्यपूर्ण सूचना आल्या आहेत. आम्ही हा अहवाल लागू करू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल.
सनातनवरून हल्लाबोल
द्रमुक नेत्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या सनातनविरोधी टिप्पणीवर नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसला विचारले पाहिजे की, सनातनच्या विरोधात इतके विष कालवणाऱ्या लोकांसोबत बसण्याची त्यांची मजबुरी काय आहे? काँग्रेसच्या मानसिकतेची ही कसली कुठली विकृती आहे.
इलेक्टोरल बॉण्ड्सवर विरोधक खोटे
इलेक्टोरल बॉण्ड्सवर मोदी म्हणाले, विरोधी पक्ष या योजनेवर खोटे बोलत आहेत. कारण, पैसा कुठून आला, कुणी दिला, याची माहिती यातून समोर आली आहे. निवडणुकीत काळा पैसा रोखण्यासाठी ही योजना होती. विरोधकांना आरोप करून पळ काढायचा आहे..