भोपाळ : केवळ आर्थिक साधने आणि अधिकार प्राप्त करणे म्हणजेच विकास झाला, असे म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात माणुसकीचा विकास हीच मानवाची खरी उन्नती आहे आणि तोच खरा मानवाचा विकास आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
भाऊसाहेब भुस्कुटे न्यासाच्या वतीने बनखेडी येथे आयोजित ‘नर्मदांचल सुमंगल संवाद’ कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. यावेळी ग्रामविकास तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत १०० सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भागवत म्हणाले, आपल्या देशात हजारो वर्षांपासून शेती केली जात आहे. मात्र, जमीन कधीही नापिकीच्या स्थितीला आली नाही. त्या तुलनेत आजच्या आधुनिक पद्धतीमुळे अनेक देशांतील शेतीला उद्ध्वस्त केले आहे. आपली संस्कृती सांगते की, व्यक्तीचे सुख हे कुटुंबातील सुखात आणि कुटुंबाचे सुख गावाच्या सुखात समाविष्ट असते. गावाचे सुख जनपद आणि जनपद राष्ट्राच्या सुखात समाविष्ट असते.
त्यामुळे आपण आपल्या परंपरेचे महत्त्व जाणून सकारात्मक ऊर्जेसह ग्रामविकास आणि पर्यावरण संरक्षणाचे कार्य केले पाहिजे. कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांनी आपल्या कार्याची माहिती दिली. भाऊसाहेब भुस्कुटे न्यासातर्फे संस्कार, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, जैविक कृषी, पर्यावरण, गोसेवा आणि संवर्धन आदी क्षेत्रात होणाऱ्या कार्याची माहिती सादर करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी तसेच शेतीच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना चित्रफितीच्या स्वरूपात सादर करण्यात आले.