माती खाल्लेले ‘स्टार प्रचारक’

राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली असताना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक ‘मान’ तयार करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. आता त्यांचे लक्ष राजस्थानवर असून, तिकडे ‘दुसरा मान’ तयार करण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. आम आदमी पक्ष राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरला असून, ‘आप’ने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली. या यादीत दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या नावांचाही समावेश आहे. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ’आप’च्या या यादीमुळे ‘इंडिया’ आघाडीच्या एकतेचेही खरे चित्र जनतेसमोर आले. पाटणा, बंगळुरू आणि मुंबई येथे आयोजित ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत अरविंद केजरीवालांनी ‘मोदी हटाओ’ची घोषणा करत, फोटो सेशन केले खरे. परंतु, प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सत्तेत असलेले राजस्थान जिंकण्याची स्वप्ने त्यांना पडू लागली आहेत. दरम्यान, आपने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांमध्ये ‘ईडी’ने समन्स धाडूनही चौकशीला जाणे टाळणारे अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रमुख नावे असून गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी दोघेही राजस्थानच्या अनेक ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना जामीन मिळेल, या आशेने त्यांना यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, खुद्द केजरीवाल चौकशीला जाणे टाळत असून, त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहेच. दरम्यान, आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठीही सप्टेंबर २०२२ मध्ये ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये हिंदू विरोधाची शपथ घेणारे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. तसेच मनीष सिसोदिया, पत्रकाराला शिव्या देणारे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचीदेखील नावे होती. ‘आप’ने राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही विधानसभेच्या एकूण २०० जागांपैकी ८६ जागांवर आपले उमेदवार उ़भे केले आहेत. त्यामुळे मोदी विरोधासाठी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या एकतेचे काय झाले, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

ज्यांनी दिल्लीच्या प्रदूषणावर खूप काही केले पाहिजे, त्यांनी गप्पा मारण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. कधी सम-विषम सूत्र लागू करू, तर कधी कृत्रिम पाऊस पाडू अशा गावगप्पा मारता-मारता अखेरीस दिल्लीत खराखुरा पाऊस बरसला. केजरीवालांकडून काही होऊ शकत नाही, हे दिल्लीकर जाणून असल्याने दिल्ली म्हणा भगवान भरोसेच होती. इकडे यांनी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या पुड्या बांधताना, तिकडे वरूणराजाने हजेरी लावून, दिल्ली खर्‍या अर्थाने भगवान भरोसे असल्यावर शिक्कामोर्तबच केले. दिल्लीत झालेल्या पावसामुळे प्रदूषणाचा स्तरही काहीसा खाली आला. तिकडे ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मोठी घटना होऊ शकते, असे सांगून एकच खळबळ उडवून दिली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दि. २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवल्याने संजय सिंह यांची दिवाळीही तिहारच्या तुरुंगात जाणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे दिवाळीच्या आनंदाला यंदा मूकणार, हे समजल्याने संजय बाबू कोठडी वाढवल्यानंतर तावातावाने खळबळजनक बोलून गेले. मनीष सिसोदिया यांनाही दिवाळी तुरुंगात साजरी करावी लागणार आहे. दारू घोटाळ्यात ‘ईडी’ने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही समन्स पाठवले खरे; मात्र या ना त्या कारणाने त्यांनी चौकशीला जाणे टाळले. चौकशी काही काळापुरती टाळली. पण, प्रदूषणाच्या समस्येपासून कसा पळ काढणार केजरीबाबू? तुमच्या अपयशाचं खापर न्यायालयावर फोडू नका, असा सज्जड दम न्यायालयाने केजरीवाल सरकारला दिला. जनतेच्या हातात प्रार्थना करणेच शिल्लक राहिले असून, त्यामुळे थोडाफार पाऊस पडून स्थिती नियंत्रणात येते, असा टोलाही न्यायालयाने केजरीवाल सरकारला मारला. पंजाब सरकारलाही न्यायालयाने फटकारत, शेतकर्‍यांनी चर्चा करून पेंढ्या जाळणे कमी करण्याविषयी उपाययोजना करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दिल्ली सरकारचे अनेक मंत्री रस्त्यावर उतरले आणि गाड्यांची शोधमोहीम सुरू केली. दिल्लीच्या सीमेवर मंत्री आतिषी यांनी शोधमोहीम हाती घेतली. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन अटकेत, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटकेत आणि केजरीवालही त्याच मार्गावर. त्यामुळे दिल्ली ‘आप’च्या नाही, देवाच्याच भरवशावर आहे, हेच खरे!