पुणे । सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असून यांनतर आता नागरिकांना मान्सूनचे वेध लागले आहेत. अशातच मान्सूनबाबत हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु असून मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर यंदा वेळेपूर्वी म्हणजेच १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली. यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे.
दरवर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते.
परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल. गेल्यावर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. परंतु, यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.