नवी दिल्ली : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून नवे अपडेट्स जारी करण्यात आले आहे. नव्या अंदाजानुसार, केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो. १५ जूनपासून देशातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते. पण हवामानातील बदलांमुळे याला विलंब झाला. पण अखेर आता मान्सून पुढे सरकला आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे.
मान्सून साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देश व्यापतो. पण यंदा केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढे सरकण्यामुळे पुढील ५ दिवस संपूर्ण वायव्य भारतात ५०-७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. इतकंच नाहीतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. विशेषतः राजस्थान, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.