मुंबई : खिचडी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांसंदर्भात युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या खोट्या आरोपांबाबत राऊतांनी माफी मागावी, अन्यथा उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करू, असा इशारा कनाल यांनी दिला आहे.
”खिचडी घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची ईडीने चौकशी केली. मात्र, ज्यांनी हा घोटाळा केला, ते सत्तेत सामील झाल्याने त्यांना संरक्षण मिळत आहे”, असा अरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले होते.
”रेमडेसीवीर घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा किंवा खिचडी घोटाळा असो, यातील कुठल्याही घोटाळ्यात माझे किंवा अमेय घोले यांचे नाव आढळले, तर आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देऊ. त्याचवेळी संजय राऊत यांनी वंदनीय बाळासाहेबांची शपथ घ्यावी की, जर आमचे नाव कुठल्याही घोटाळ्यात आढळले नाही, तर ते खासदारकीचा राजीनामा देतील”, असे खुले आव्हान कनाल यांनी दिले होते. याचप्रकरणी आता राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.