मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दयानंद पांडे याच्या विरोधात वॉरंट जारी

मालेगाव : शहरातील एका मशिदीच्या आवारात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमीदेखील झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र, नंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.

प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे याच्या विरोधात 10 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सुनावणीच्यावेळी सुधाकर द्विवेदीही न्यायालयात सातत्यानं गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेत पुढील सुनावणीत हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.