मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्हात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने महानगरपालिकेच्या सर्व अधिकार्‍यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. पावसामुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

मान्सून सक्रिय असल्याने पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून, येत्या २४ तासांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, येत्या चार-पाच दिवसांमध्येही हीच स्थिती राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. रायगड जिल्ह्यात बुधवारी पहाटे पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. ढगांचा गडगडाटसह मुसळधार पाऊस पडत आहे. आंबेनळी घाटात रात्री रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यामुळे दोन्ही कडची वाहतूक ठप्प झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३० जून पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे.