मुंबईत २ लाखाहून अधिक कुटुंबांना मिळणार हक्काचं घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेगा प्लान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक महत्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत रखडलेले १२० पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावण्याचा मेगा प्लान शिंदेंनी आखला आहे. त्यानुसार २ लाखाहून अधिक कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. या १२० प्रकल्पातील ६० प्रकल्प हे पालिकेचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे रखडलेले प्रकल्प सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, एमआयडीसी, महाप्रित आणि पालिका यांच्या मार्फत मार्गी लावण्याचा मानस आहे.

इमारतीच्या बांधकामाचा खर्च हा सेलेबल इमारतीतल्या खोल्या विकून झालेल्या पैशातून वसूल केला जाणार असल्याची माहिती आहे. घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणे या रखडलेल्या पुर्नविकासाला चालना दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर घेण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे मुंबईत महायुतीला याचा मोठा फायद होऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
दरम्यान, कोस्टल रोड आणि वांद्रे सी-लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या मार्गाचं उदघाटन होणार आहे.. त्यामुळे मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत १२ मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होईल. कोस्टल रोडचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलाय. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झालाय. आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.