चार दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी वायूच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. गुप्तचर विभागाने याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितली.
या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मुख्य मार्गांव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत.
त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता, याबाबत तपास यंत्रणा तपास करत आहेत.रूळ, पूल उडवण्याचे प्रशिक्षण दहशतवाही जान मोहम्मदला रूळ आणि रेल्वेचे पूल उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानातून कॉलिंग अॅपद्वारे जानला रूळ आणि पूल उडवून देण्याचे निर्देश दिले गेले होते. हे निर्देश हस्तक मोहम्मद रहिमुद्दिन द्यायचा, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.
मूळचा मुंबईचा रहिमुद्दीन आता पाकिस्तानात राहात आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी कारवाई करीत दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त केल्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात् एटीएसने कारवाई करीत एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. झाकीर हुसेन शेख असे त्याचे नाव असून, जोगेश्वरी येथून त्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. एटीएस त्याची चौकशी करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले.