Good News : मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा उद्यापासून धावणार रेल्वे!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२२ । नविन मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा ०९०५१ व दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल ०९०५२ ही गाडी दि.२३ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. दरम्यान, भुसावळ बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेसच्या प्रचंड प्रतिसादामुळे तमाम खान्देशातील प्रवाशांची खान्देश एक्स्प्रेस दररोज करण्याची मागणी होती परंतु मध्य रेल्वेच्या जळगाव भुसावळ स्थानकांवर तांत्रिक अडचणींमुळे शक्य होत नव्हते यावर पश्चिम रेल्वेने अखेर पर्याय काढला आहे.

पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.२३ डिसेंबर पासुन ३१ मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असून सदर गाडी रविवार , मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथून सुटेल प्रवासादरम्यान दादर, बोरीवली, वापी, बलसाड, नवसारी, चलथान, भे, बारडोली, व्यारा, नवापुर, नंदुरबार या ठिकाणी थांबुन सकाळी ८.०५ मिनीटांनी दोंडाईचा येथे पोहोचेल.

दोडांईचाहुन सोमवार बुधवार व शनीवारी रात्री १०.१५ मिनीटांनी सुटेल तर मुंबई सेंट्रल येथे सकाळी ६ वा. पोहचेल. सदर गाडी दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर दिवसभरात एक फेरी उधनासाठी धावणार असून सकाळी ११.३० वा.दोडांईचाहुन उधनासाठी सुटेल व उधना येथे दुपारी २.३० वा. पोहचेल उधना येथून  ४.३० वा दोंडाईचासाठी निघेल व दोंडाईचा येथे सायंकाळी ७.३० वा. पोहचेल. दरम्यान उधणा ते पुणे रेल्वे सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले आहे.