मुक्ताईनगर पर्यटन क्षेत्रासाठी ५० कोटींचा निधी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुक्ताईनगर:  उद्योगधंद्यांमध्ये आपले काय? म्हणून यांनी हिस्सेवारी मागितल्याने राज्यातील उद्योग-धंदे बाहेर गेले, मात्र शिंदे सरकारच्या काळात पाच लाख कोटींचे करार करण्यात आले. राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून उंटावर शेळ्या हाकणारा किंवा फ सबूक लाईव्ह करणारा नाही तर ‘फेस टू फेस’ बोलणारा मुख्यमंत्री असल्याचे एकनाथ शिंदे यांनी येथे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर पर्यटन क्षेत्रासाठी ५० कोटींचा निधी देण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर करीत असल्याची घोषणा यावेळी केली.

सरकारच्या वतीने पैसे दिले जातील व आगामी अर्थकसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येईल व बोदवड सिंचना योजना टप्पा दोनचे टेंडर काढण्याच्या सूचना करीत असल्याचे ते म्हणाले. यांची व्यासपीठावर उपस्थिती मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला जोडणाऱ्या मेंढोळदे ते सुलवाडी या पुलाचे भूमिपूजन सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते झाले. भूमिपूजनानंतर मेंढोळदे गावानजीक आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, नंदकिशोर महाजन आदींची उपस्थिती होती.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमातून चार कोटी लोकांना लाभ देण्यात आला आहे मात्र विरोधकांना पोटदुखी उठली आहे व या पोटदुखीसाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती, तेच आमचे ऐश्वर्य, असेही ते म्हणाले.