मुंबई : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा वादंग सुरु झाल्याचे पुढे आले आहे. एकीकडे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राज्याची सूत्रे द्यायची आहेत, असं वक्तव्य केलं. तर नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा विषय संपला आहे, असे म्हणाले. त्यामुळे यावरून आता मविआतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आलीये.
मालवणमधील सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “उद्याच्या विधानसभा निवडणूकीत कोकण, महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट आहे. या कोकणाने कायम शिवसेनेला ताकदच दिली. कुठे काहीही झालं तरी कोकणचा किल्ला बुलंद राहिला. लोकसभेत दुर्दैवाने आपल्याला पराभव पत्करावा लागला तरी तो विसरून उद्याच्या विजयाची तयारी केली पाहिजे. या भागातील विधानसभेचे सर्व मतदारसंघ आपण लढणार आहोत. ते सर्व मतदारसंघ जिंकायचे आहेत. उद्या महाराष्ट्रात १०० टक्के शिवसेनेची सत्ता येणार आहे. उद्धव ठाकरेंच्या हातात आपल्याला राज्याचे सूत्र सोपवायचे आहेत. अशा सरकारमध्ये कोकणातील नेत्यांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी मोठ्या संख्येने कोकणातील आमदारांना निवडून द्यायला हवं,” असे ते म्हणाले.
मात्र, दुसरीकडे, नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता ते म्हणाले की, “आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा महाविकास आघाडी राहिल हे आम्ही जाहीरपणे सांगितलं आहे. त्यावेळी उद्धवजी, शरद पवार साहेब आणि मीसुद्धा होतो. त्यानंतर आता तो विषय बंद झाला आहे. महाराष्ट्राला जे सरकार आता रोज अपमानित करत आहे, त्याबद्दल बोला. महाराष्ट्रात शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. एमपीएससीच्या मुलांकडे सरकार दुर्लक्ष करत होते. या राज्यात कोण खूश आहे? त्यामुळे मुख्यमंत्री हा विषय आमच्यासाठी गौण आहे. आधी महाराष्ट्रातील सरकारला सत्तेतून बाहेर काढून महाराष्ट्राला वाचवणं हे आमचं दायित्व आहे. त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करत आहोत,” असे ते म्हणाले.