मुंबई : मुख्यमंत्री कोण बनणार ते सगळे नेते बसून ठरवतील, हे तुमचं आमचं काम नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले. महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची मागणी केली होती.
नाना पटोले म्हणाले की, “महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण बनणार, असं वातावरण सध्या बनवलं जातंय. त्यामुळे उद्धवजींनी मुद्दाम तो प्रश्न इथे उपस्थित केला. माध्यमांमध्ये ते वेगळ्या पद्धतीने जात असेल. आम्हाला महाराष्ट्रातील हे सरकार उध्वस्त करून जनतेसाठी प्रामाणिक असणारे सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचे आहे. मुख्यमंत्री कोण बनणार ते सगळे नेते बसून ठरवतील. हे तुमचं आमचं काम नाही,” असे ते म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“नाना पटोले आणि शरद पवार साहेबांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. माझा त्याला पाठिंबा असेल. पण जो अनुभव आम्ही भाजपसोबत यूतीत असताना घेतला आहे त्याची पुनरावृत्ती मला नको आहे. आम्ही २०-३० वर्ष यूतीमध्ये असताना आमच्या अशाच बैठका व्हायच्या. त्यामध्ये ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होणार असं जाहीर केलं जायचं. हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोंडे पाडण्यात टाकायचो. यात पाडापाडीचं राजकारण व्हायचं. त्यामुळे आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा मग पुढे जा. पण या धोरणाने जाऊ नका,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.