मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार जळगाव दौऱ्यावर

जळगाव : धरणगाव, चौपड़ा आणि जळगाव तालुकावासीयांना वरदान ठरणाऱ्या आणि निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खणीकर्म विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार, आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, निम्न तापी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता वाय. के. भदाणे, कार्यकारी अभियंता एम. एस. चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी येळाई, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी, डी.सी. पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी शनिवारी भोकर येथे नदी परिसरात पाहणी केली.

हा पूल तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाईल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे. स्टील रेलिंग रोडसाइड फर्निचर व इतर अनुषंगिक बाबींचा यात समावेश आहे. यासाठी राज्य शासनाने तब्बल १५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.