मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत आज महिला सशक्तीकरण मेळावा, महिलांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे – पालकमंत्री गिरीश महाजन

जळगाव :  महिला सक्षमीकरण प्रक्रिया लोकाभिमुख करून महिलांना संघटित करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांशी संबंधित विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार धुळे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत मंगळवारी महिला सशक्तीकरण मेळावा घेण्यात येणार आहे.

शासनाच्या योजना लोकाभिमुख करणे. तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा व मार्गदर्शन करण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या मेळाव्यास जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्यास धुळे जि.प.अध्यक्षा धरती देवरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव, नंदुरबारचे खासदार ॲड.गोवाल पाडवी, आमदार अमरीशभाई पटेल,किशोर दराडे,सत्यजीत तांबे, जयकुमार रावल,काशीराम पावरा,कुणाल पाटील, साक्रिच्या आमदार मंजुळा गावित,फारुक शाह,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील,महिला व बाल विकास विभागाचे नाशिक विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे,राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे समादेशक प्रभाकर शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीष जाधव आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या महिला मेळाव्यास सर्व नागरिकांना प्रवेश विनामुल्य आहे. तरी धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, नागरीक, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.