जळगाव : रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असलेल्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला काल शनिवारी रात्री ८:४५ ला डंपरने धडक दिली. यामध्ये लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच चालक, अंगरक्षकलाही किरकोळ दुखावत झाली. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. लता चंद्रकांत सोनवणे तसेच माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे त्यांचे सुरक्षा रक्षक व वाहन चालक यांच्या तब्येची चौकशी केली.
शनिवारी संध्याकाळी सात वाजता कुरवेल ते तावसा या रस्त्याचे आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे वाहनातून (क्र.एम.एच. १९, बी.यू. ९९९) जळगावकडे येत होते. त्या वेळी चालकासह अंगरक्षकही वाहनात होते व मागे पोलिस स्कॉड होते. त्या वेळी डंपरने (एम.एच. १९, झेड – ६२४५) आमदार सोनवणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान होऊन वाहनातील चारही जणांना दुखापत झाली. अपघात होताच जखमींना जळगावला हलविले व प्राथमिक उपचार करून घरी नेण्यात आले.
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच शिवसेनेचे मंत्री शंभुराजे देसाई यासह सर्व शिवसेना पक्षातील तसेच इतर पक्षातील, राज्यातील नेते व आमदारांनी सगळ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. अॅक्सिडेंट झाल्यानंतर आ.लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, वाहन चालक व सुरक्षा रक्षक यांना अॅर्किड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ.परेश दोशी व त्यांच्या टीमने अनेक चाचण्या तसेच तपासणी व औषधोपचार करून त्यांना पुढील दोन दिवस संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. ना.गिरीश महाजन, ना.गुलाबराव पाटील, आ.किशोर अप्पा पाटील, आ.मंगेश चव्हाण व जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, चोपडा मतदार संघातील व जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करण्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रिघ लागली होती. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील दोन दिवस ते विश्रांती घेणार आहेत, असे त्यांचे स्वियसहाय्यक गणेश भोईटे यांनी कळविले. यामध्ये प्रवास करीत असलेले चौघ जण दैवबलवत्तर म्हणून बचावले.