मुलासाठी स्टडी टेबल खरेदी केला अन् घरी येत असताना घडले अनर्थ…

जळगाव : भरधाव आयशर गाडीच्या धडकेत दुचाकीवरील दीपक गोकुळ सोनवणे तसेच त्यांचा मुलगा लोकेश दीपक सोनवणे (5) रा. बिबानगर हे पितापुत्र गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुरुवार 26 रोजी रात्री महामार्गावरील साईराज रेस्टॉरंटजवळ घडली. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत या दोघा जखमींना तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दीपक सोनवणे यांनी मुलगा लोकेश याच्या अभ्यासाठी स्टडी टेबल खरेदी केला. त्यानंतर पावभाजी घेवून हे पितापुत्र क्र. एमएच 19 डीयू 1447 या दुचाकीने बिबानगर येथे घरी जात होते.

त्याचवेळी समोरुन भरधाव आयशर क्र. एमएच 31 एफसी 4745 ने दुचाकीला धडक दिली. यात गाडीचे चाक दोघा पायावरुन गेल्याने दिपक सोनवणे गंभीर जखमी झाले. तर त्यांचा मुलगा लोकेश याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागेवर बेशुध्द झाला. दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तालुका पोलिसांनी आयशर गाडी जप्त करुन चालकाला ताब्यात घेतले.