तरुण भारत लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यात २५ वर्षीय मूकबधिर विवाहितेवर अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मेहूणबारे पोलिसांत गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक करण्यात आली आहे. चाळीसगाव न्यायालयाने संशियताला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
प्रताप भीमसिंग ठाकरे (वय ३३; रा. कुंझर) असे अटकेतील नराधमाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय मूकबधिर महिलेला तीन अनोळखी लोकांनी रविवारी रात्री आठ वाजता दुचाकीवरून बसवून तिला गावाजवळील तलावाजवळ नेले. तेथे दोघांनी पीडितेस ओढाताण करून डोळ्यावर बुक्याने मारहाण केली तर एका व्यक्तीने अत्याचार केला. रविवारी रात्री ८ ते सोमवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेला उपचारासाठी धुळे येथे शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीडिता मूकबधिर असल्यामुळे व ती गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी तिचा जबाब घेण्यासाठी विशेष शिक्षिकेला पाचारण केले. विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने पीडितेने हा सर्व प्रकार सांगितला. पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्यासह मेहूणबारे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. घटनेचा पंचनामा केला.
यावेळी अत्याचार करणाऱ्यांच्या माग मिळावा म्हणून श्वानपथकासही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता.
स्केचच्या आधारे संशयितांचा शोध पीडित महिलेने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी स्केच तयार केले. पोलिसांनी आपले कौशल्य वापरून मोठ्या शिताफीने संशयितास ताब्यात घेतले. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, राजू सांगळे यांच्यासह धर्मराज पाटील, कमलेश राजपूत, मिलिंद शिंदे, योगेश मांडोळे, अमोल पाटील, गणेश नेटके, महेश बागूल, राजेंद्र निकुंभ, नीलेश लोहार, शैलेश माळी, प्रताप मथुरे, गोरक चकोर, दीपक महाजन, योगेश बोडके, हनुमंत वाघोरे, यांच्या पथकाने या स्केचच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.
प्रताप भिमसिंग ठाकरे (वर ३१, रा. कुंझर याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून शनिवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
“आमच्यासाठी या गुन्ह्याची उकल करणे खूप महत्त्वाचे होते. मात्र पीडितेच्या जबाबावरून सुरवातीला तीन संशयित असल्याचे सांगितले होते. मात्र पोलिस तपासात केवळ एकच संशयित आरोपी निष्पन्न झाला आहे.” – अभयसिंग देशमुख ,सहाय्यक पोलिस अधीक्षक, चाळीसगाव