अमळनेर : येथील पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षणाधिकाऱ्याने जवखेड (ता.अमळनेर) येथील शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी दिली. शिवाय शाळेला मिळालेली शासकीय अनुदानातील ५ टक्के रक्कम खंडणीची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार मंगळवार, २८ रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात उमेश पाटील यांनी फिलेल्या फिर्यादीवरून गटशिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमळनेर तालुक्यातील जवखेड येथील शाळेबद्दल गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी एका व्हॉटसॲपवर बदनामीकारण मजकूर टाकला होता. शाळेचे लिपीक उमेश राजेंद्र पाटील यांनी २७ रोजी अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे अर्ज केलेला होता. नकल घेण्यासाठी उमेश पाटील व शाळेचे सहकारी हे मंगळवार, २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता अमळनेर पंचायत समिती कार्यालयात गेले होते. उमेश पाटील व सहकारी यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांची भेट घेवून शाळेची बदनामी करू नका असे सांगितले.
दरम्यान, रावसाहेब पाटील यांनी त्यांना शिवीगाळ करून सन-२०१२ पासून तुमच्या शाळेतला जे शासकीय अनुदान मिळाले आहे. त्यात मला ५ टक्के दराने पैसे द्या, नाहीतर तुमच्या शाळेची मान्यता रद्द करेल, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर उमेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री १०.३० वाजता गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहे.