जळगाव : आजकाल लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराची अनेक प्रकरणे देशभरात समोर आली आहेत. देशाची राजधानी दिल्लीपासून मध्यप्रदेशपर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, आता जळगाव शहरातही धर्मांतरांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
शहरातील मंगलम मंगल कर्यालय याठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाप्रमुख ह.भ.प.योगेश महाराज रविवारी दुपारी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी हॉल बूक करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी तारीख खाली असल्याचे मंगलम मंगल कार्यालयाच्या मालकाने सांगितले. मंगलम कार्यालयाच्या मालकाने सांगितल्यानंतर महाराज हॉल पाहण्यासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांना काही लोक हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देत होते. त्या ठिकाणी उपस्थितांना येशू धर्म जगात महान असल्याचे पटवून देत होते. पैशांचे आमिष दाखवून बंजारा व भिल्ल समाजातील नागरिकांचा धर्मातरांचा प्रयत्न सुरू होता. त्यांचे धर्मांतरासाठी मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू असल्याचे दिसून आले. ही बाब ह.भ.प.योगेश महाराज यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या सतर्कतेने धर्मांतरांच्या रॅकेटचा पर्दाफाश
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसार जिल्हाप्रमुख हरीश कोल्हे, बजरंग दलाचे महानगरप्रमुख समाधान पाटील मंगलम मंगल भवन येथे आले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणाहून हिंदू बांधवांचे ख्रिश्चन धर्मांत धर्मांतर करणार्या केरळच्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमुळे हे धर्मांतराचे रॅकेट उघडकीस आले आहे.
शहरात अजून किती ठिकाणी या धर्मांतरांची प्रक्रिया सुरू आहे? याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी यासंदर्भात सखोल चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी याठिकाणी भेट दिली. यामागे काही स्थानिक कनेक्शन आहे काय? याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.