मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे 22 सदस्य आज युरोपच्या दौर्यावर रवाना होत आहेत. या सदस्यांसाठी 24 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर, 2023 या कालावधीत जर्मनी, नेदरलँड आणि युनायटेड किंगडम, तीन युरोपीय देशांच्या अभ्यासदौर्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यासदौर्यात सहा अभ्यासभेटी तसेच बैठका होणार आहेत. या परदेश अभ्यासदौर्याला भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली आहे. अभ्यासदौर्यावरील सदस्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे करत आहेत. फ्रँन्कफर्ट (जर्मनी), अॅमस्टरडॅम (नेदरलँड) आणि लंडन (यु. के.) या शहरांना हे शिष्टमंडळ भेट देईल. एकूण 22 सदस्यांमध्ये निम्म्या सं‘येने म्हणजे 11 महिला सदस्य सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली. अभ्यासदौर्यात प्रारंभी फ्रँन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्धउत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर तसेच भारताच्या तेथील उच्चायुक्तांसोबत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणार्या अभ्यासगटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आली आहे.
अॅमस्टरडॅम येथे नेदरलँडच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच्या सदस्यांसोबत अभ्यासभेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलँडमधील राजदूतांचीही अभ्यासभेटीवरील सदस्य भेट घेतील. त्याचप्रमाणे लंडन येथेदेखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन तसेच लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, यु. के. पार्लमेंटमधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय आणि महासचिव यांच्यासमवेतदेखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे.