मोठी बातमी ! लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ

पारोळा : विट उत्पादकाकडून माती वाहतुकीस परवानगी देण्यासाठी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठ्याने २५ हजाराची लाचेची मागणी केली. या प्रकरणी धुळे एसीबीने शुक्रवार, 24 रोजी कारवाई करत तलाठ्यावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वर्षा रमेश काकुस्ते असे लाच मागणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.

पारोळा तालुक्यातील मौजे शिवरेदिगर येथील तक्रारदार असून त्यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे. विट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतुक करण्याकरीता त्यांनी तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरीता २५,०००/-रू जमा करून घेतले.

त्यानंतर तक्रारदार यांनी गौण खनिज परवाण्याची चौकशी करण्याकरीता तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदार यांचेकडे यापुर्वी दिलेल्या पैशांची पावती न देता त्याव्यतिरिक्त २५,०००/-रु लाचेची मागणी केल्याची ला.प्र.विभाग, धुळे कार्यालयात दि. १२.१२.२०२३ रोजी तकार दिली होती.

सदर तक्रारीची दि. १३.१२.२०२३ रोजी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याचदिवशी पुन्हा त्याचे पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले म्हणुन त्यांचे विरुध्द पारोळा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक  शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.