भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने आज शनिवारी २४ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. यासह त्याची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिखरने याबाबतची माहिती दिली आहे
यावेळी तो शिखर म्हणाला की, माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवतोय. यावेळी मी माझ्या मनात असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत. मी कृतज्ञ आहे. लोकांनी दिलेलं प्रेम आणि सपोर्टसाठी मी आभारी राहिन, सगळ्यांचे धन्यवाद, अशी पोस्ट शिखरने शेअर केली. तसेच आंतरराष्ट्रीय आणि देशाअंतर्गत क्रिकेटमधून मी माझ्या निवृत्तीची घोषणा करतोय. मी माझ्या निवृत्तीची घोषणा करताना मनात समाधान आहे की, मी माझ्या देशासाठी चांगलं खेळलो. मी बीसीसीआयचा खूप आभारी आहे, ज्यांनी मला खेळण्यासाठी संधी दिली, असं शिखरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
शिखर धवनने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.यानंतर, 2011 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
धवनची कारकीर्द :
भारताकडून खेळताना धवनची कारकीर्द अतिशय चमकदार होती. त्याने टीम इंडियासाठी एकापेक्षा एक खेळी खेळल्या. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला. धवनने भारतासाठी एकूण 269 सामने खेळले, ज्यात त्याने 10867 धावा केल्या. धवनने कसोटीत 34 सामने खेळले असून 58 डावात 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत. त्याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.11 च्या सरासरीने 6793 धावा आणि 68 टी20 सामन्यात 1759 धावा केल्या. धवनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 24 शतके आणि 55 अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 17 शतके आणि 39 अर्धशतके आहेत. त्याने कसोटीत 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. धवनने T20 मध्ये 11 अर्धशतकेही झळकावली आहेत.