मोठे वाघोदे येथे गॅस्ट्रोची लागण, सीईओनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे दिले आदेश

जळगाव : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे गेल्या आठवड्यात गॅस्ट्रोची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही खेड्यावर वाघोद्या सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तिकरित्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात सूक्ष्मकृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी दिले आहेत.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी गुरुवार 30 रोजी रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी रावेर पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत श्री अंकित हे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक गणेश भोगावडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोसोदे, रावेरच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री अंकित यांनी मोठे वाघोदे येथे सुरू असलेल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाची यावेळी पाहणी केली. तसेच गॅस्ट्रो संशयित रुग्ण आढळून आलेल्या भागाची पाहणी करून स्वच्छता विषयक सूचना केल्या.

सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे उद्भवलेल्या परिस्थिती सारखी परिस्थिती जिल्ह्यातील इतर कोणत्याही गावात उद्भवू नये याकरिता मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाच्या माध्यमातून सूक्ष्म आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील यावेळी दिले.

गेल्या चार दिवसात एकही नवीन रुग्ण नाही
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे गेल्या आठवड्यात गॅस्ट्रोची लागण झाली होती. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांवर तसेच गॅस्ट्रो संदर्भातील लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून गेल्या चार दिवसात वाघोदा येथे एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.

पाण्याचे शद्धीकरण
गुरुवार दिनांक 30 रोजी जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग तसेच पाणी व स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून वाघोदा येथे पिण्याचे व वापराच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच परिसरातील स्वच्छतेबाबत देखील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. गाव व परिसरातील इतरत्र भागात संपूर्णपणे स्वच्छता करून काळजी घेण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

आशा स्वयंसेविकांमार्फत सर्वेक्षण सुरू
वाघोदा येथे आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे.

डॉ. इंद्राणी प्रसाद करणार मार्गदर्शन
वाघोदा येथे गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर संशयित रुग्णांचे सॅम्पल आरोग्य विभागामार्फत घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात काही रुग्णांना कॉलराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर कॉलरा आजारावरील उपचार पद्धती व घ्यावयाची काळजी यासंदर्भात शुक्रवार 31 मे रोजी डॉ. इंद्राणी प्रसाद या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन वर्गास जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिले आहेत.