मोदींच्या अमेरिका दौऱ्यात भारताने काय कमावले?

अमेरिकास्थित  असलेल्या कोणत्याही  भारतीय व्यक्तीची मा. मोदीच्या दौऱ्या बद्दल प्रतिक्रिया विचारल्यास  ते सांगतात,” प्रचंड उत्सुकता,प्रचंड उत्साहाचे वातावरण, आणि माध्यमांनी घेतलेली दखल पहाता ,अमेरिकन राज्यकर्त्यांना भारताच्या भावी सामर्थ्याची जाणीव झालेली नक्कीच जाणवते आहे.”

अमेरिकेच्या होमलँड सेक्युरिटी च्या अहवालानुसार जानेवारी २०२२ मध्ये अंदाजे  ५ लाख ८० हजार भारतीय लोक ग्रीन कार्ड होल्डर्सच्या रांगेतून अमेरिकेचे कायम नागरिकत्व मिळवण्यास पात्र आहेत.  २०२२ मध्ये ९३हजार भारतीयांना अमेरिकेचे  कायम नागरिकत्व मिळालेले आहे. चीन  आणि मेक्सिकोतूनही अनेक लोक मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत जात आहेत. त्याचबरोबर  असेही आढळून आले की भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत इतरांच्या मानाने जास्त उत्पन्न मिळवत आहे. अमेरिकेत भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या वाढते आहे.

२००५ साली मा. मोदीना व्हिसा सुद्धा नाकारणाऱ्या अमेरिकेने आज त्यांना दिलेला सन्मान पहाता,सद्यकाळात भारताच्या बरोबरच्या  मजबूत संबंधांची गरज  अमेरिकेला किती तीव्र पणे जाणवते आहे,हे लक्षात येते. अर्थात भारतालाही त्याची गरज आहेच.

 ‘भारताचे भौगोलिक राजकीय महत्व’

तैवान वर असलेली चीनची नजर, रशिया युक्रेन युद्ध, अमेरिका चीन चे ताणलेले संबंध ( एक नवे शीतयुद्ध ),  आणि खिळखिळी झालेली पाकिस्तानची अर्थ-राज्य व्यवस्था, या पार्श्वभूमीवर अमेरिकेला भारतासारख्या मित्राची,भागीदाराची गरज होती,आणि भविष्यातही असेल हे सर्वज्ञात आहे.  गट निरपेक्ष असे भारताचे नेहरूकालीन धोरण आजही सर्व देशांना माहित आहे.पण रशिया युक्रेन युद्धकाळात  भारताने रशियाकडून स्वस्तात घेतलेले तेल, मणीपूर मधला हिंसाचार, यासारख्या अनेक गोष्टी बाजूला ठेवून  अमेरिकेने, उद्योग, व्यापार, संरक्षण विस्तार धोरणांना अधिक महत्व देत मा. मोदींचे भव्य दिव्य  राजकीय स्वागत केलेले दिसते.यापूर्वी देखील मा. ओबामा, ट्रम्प यांनीही मा. मोदींचे स्वागत केलेले होते. या नेत्यांची लोकप्रियता तसेच येणाऱ्या निवडणुकांची गरज हे एक  कारणही त्यात असावे.

‘ संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान विक्री आणि हस्तांतरण’ 

जानेवारी २०२३ मध्ये  अवघड आणि नवीन (क्रिटिकल,इमर्जिंग) अशा तंत्रज्ञानाच्या माहितीच्या देवाण-घेवाणीतून सुरु झालेल्या अमेरिका आणि भारताच्या    सहकार्य प्रवासाला जून २०२३ मध्येच चांगले फळ मिळाले.

१३-१४ जून २०२३  रोजी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस ते मा. मोदी, अजित डोवाल, सुब्रमण्यम जयशंकर यांना भेटले होते. ही मा. मोदींच्या अमेरिका दौऱ्याची पूर्व तयारी होती. दीर्घकालीन सामरिक,प्रादेशिक,द्विपक्षीय चर्चा आणि त्यातून संरक्षण,तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका आणि भारताची भागीदारी या संदर्भात काही उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आली.

या भेटीतील सर्वात मोठा उद्देश म्हणजे भारतीय नौदलासाठी वापरल्या जाणाऱ्या फायटर जेट विमानाची इंजिन बनविण्यासाठी जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस  (जी इ ) या अमेरिकन कंपनी बरोबर हिंदुस्थान एरो नोटिक्स  (एच ए एल) या भारतीय कंपनी बरोबर होणार करार. आज अमेरिकेत आणि कोरियात या एफ ४१४ जेट  इंजिनावर आधारित लढाऊ विमानं ( लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) वापरली जात आहेत. भारताच्या एरोनॅटिकल  डेव्हलपमेंट एजन्सीने  तेजस या लढाऊ विमानाच्या (एमके -२) प्रकारासाठी  जी इ कंपनीच्या  एफ ४१४ आयएनएस ६ आणि एफ ४१४ जी याची निवड सॅब ग्रीपेन इ /एफ एअरक्राफ्ट साठी केलेली आहे. हे इंजिन भारतात बनविले जाईल. हे तंत्रज्ञान अमेरिकेकडून भारतात हस्तांतर होईल. ( हे प्रकरण सध्या अमेरिकेतील सेनेट  समोर विचारार्थ आहे.) अनेक वर्षांपूर्वी रशिया कडून मिग विमानांसाठी असे तंत्रज्ञान  घेतलेले होते.

दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे भारतीय नौदलासाठी उपयुक्त  होऊ शकणारी ३१ ड्रोन  ची खरेदी.  ही खरेदी जनरल ऍटोमिक्स कॉर्पोरेशन या कंपनी कडून होईल. त्यांची जोडणी भारतात होईल. ( या कंपनी चे चीफ एक्झिक्युटिव्ह डॉ.विवेक लाल हे पूर्वी रिलायन्स ग्रुपसाठी काम करीत होते.)  रिमोटने नियंत्रित होणारी मानव विरहित विमानं /ड्रोन १२,००० ते १५,००० मिटर उंचीवरून उडत असल्याने,जमिनीवरून मारा करून त्याला पाडता  येत नाही.यामुळे भारताची संरक्षण क्षमता नक्कीच वाढेल.

अमेरिका,जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत (क्वाड् देश) यांच्यामधील नौदल सहयोग अधिक मजबूत केला जाईल. चीनच्या दक्षिण आणि पूर्व समुद्र प्रदेशात त्यांचे अस्तित्व हे महत्वाचे ठरते.

‘भारतात केली जाणारी परकीय गुंतवणूक, आणि रोजगार निर्मिती ‘ 

तिसरे महत्वाचे यश म्हणजे सेमी कंडक्टर /चिप  उत्पादनातील करार. आज आधुनिक उद्योगात चिप हा प्राण असतो. यांच्या निर्मितीत चीन,तैवान,कोरिया या देशांची मक्तेदारी आहे. यासाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान अमेरिका पुरवीत असते. मायक्रॉन  टेक्नॉलॉजी या कंपनीतर्फे भारतात चिप/सेमीकंडक्टर  बनविण्यासाठी  ८२५ मिलियन डॉलर्स ची गुंतवणूक होईल.भारत सरकारतर्फे त्याला मदत केली जाईल,यामुळे भारतात ५,००० प्रत्यक्ष तर १५,०००  अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. ( मायक्रॉन कंपनीचे मुख्य डॉ. संजय मेहरोत्रा हे मूळ भारतीय ,सॅन डिस्क  कंपनीचे निर्माते आहेत.) एप्लाइड मटेरियल्स या कंपनीतर्फे भारतात  इंजिनिअरिंग सेंटर्स सुरु करण्यासाठी ६०० मिलियन  डॉलर्स गुंतवले जातील. ( या कंपनीचे अध्यक्ष हे डॉ.रमण अच्युतरामन,प्रभू राजा हे भारतीय आहेत.) तसेच  लॅम रिसर्च कंपनीतर्फे ६०,००० भारतीय इंजिनिअर्स ना सेमी कंडक्टर संदर्भात प्रशिक्षण दिले जाईल. गमतीचा भाग असा की  याच बरोबरीने भारतातील इप्सिलॉन कार्बन या कंपनीतर्फे अमेरिकेत ६५० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी उत्पादनात केली जाणार आहे. अमेरिकन कंपन्यांतर्फे भारतात ६ अणू भट्ट्यां ची निर्मिती केली जाणार आहे. एअर इंडिया तर्फे अमेरिकेत बनविलेल्या २०० बोईंग विमानाची खरेदी केली जाणार आहे, त्यामुळे अमेरिकेत रोजगार निर्मिती होईल. तर बोईंग कंपनीतर्फे १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक भारतात केली जाईल,त्याद्वारे येत्या २० वर्षात ३१,००० भारतीय पायलट्सना प्रशिक्षण देण्यात येईल.

‘दूरसंचार  आणि विदा क्षेत्रातील सहयोग”

अमेरिकेच्या  आंतर राष्ट्रीय विकास वित्त महामंडळ आणि खासगी उद्योगांतर्फे ओपन रेडिओ ऍक्सेस नेटवर्क म्हणजे कोणत्याही उत्पादकाने तयार केलेल्या साधनांद्वारे कोणाशीही सहज संपर्क साधता येण्या  साठी  तयार केलेले तंत्रज्ञान जे पुढे ५जी, ६ जी साठी उपयुक्त ठरेल, हे भारताला उपलब्ध करून देणे, या साठी एका गटाची निर्मिती करण्यात आली आहे.  आज माहिती/विदा  चे आदान- प्रदान करण्यासाठी तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी क्वांटम तंत्रज्ञाना चा आणि त्याच बरोबर सुपर कॉम्प्युटर्स चा वापर केला जातो. हे अत्यंत महाग आणि प्रगत तंत्रज्ञान आहे, या साठी २ मिलियन डॉलर्स ची तरतूद करण्यात आली आहे. भारतातील सी डॅक या संस्थेला याचा लाभ होईल. या व्यतिरिक्त ३५ क्षेत्रात ( शाश्वत हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा …) सहयोगाचे  करार करण्यात आलेले आहेत.

‘अंतराळ संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील सहयोग’ 

भारताची अंतराळ क्षेत्रातली  इसरोची प्रगती पाहून नासा चे वैज्ञानिक भारतातील वैज्ञानिकांना प्रशिक्षण देतील. भारताने यापूर्वी अर्सेनिस करारात सहभाग नोंदवला असल्याने, अंतराळात, प्रामुख्याने चंद्र आणि मंगळ या वरील संशोधनात भारताचा सहभाग असेल. माहितीचे आदान -प्रदान असेल.

भारतीय विद्यापीठ, आयआयटी  आणि अमेरिकन विद्यापीठांमध्ये सामंजस्याचे करार करून संशोधनाला चालना देण्यात येईल.व्हिसा प्रक्रिया वेगवान करण्यात येईल,आणि अमेरिकेचे दूतावास अहमदाबाद  तसेच बेंगळुरू येथे उघडण्यात येतील. भारत सरकारतर्फे शिकागो विद्यापीठात स्वामी विवेकानंद अध्यासन, तर  खासगी देणगी तर्फे तामिळ  अभ्यासासाठी होस्टन विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात आले.

अमेरिकेच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या प्रमिला जयपाल,ठाणेदार,आणि रोहित खन्ना या मूळच्या भारतीय.  मा. मोदीच्या दौ-यात त्यांची उपस्थिती महत्वाची होती ज्याची विशेष दखल मा. कमला हॅरिसन यांनी घेतली.तसेच मा. मोदीच्या भोजन प्रसंगी अंबानी,आनंद महिंद्रा हे निमंत्रित होते. या महत्वाच्या दौ-यात भारताचे संरक्षण मंत्री कुठे दिसत नव्हते.

एकुणात २१व्या  शतकात  मा. मोदी यांचे नेतृत्व केवळ जी २० देशांनीच  नव्हे तर सर्व जगभराने  मान्य केलेले दिसते. सर्व जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभे असतांना अमेरिका आणि भारत सर्व जगाच्या आर्थिक विकासाचे इंजिन ठरू शकेल अशा विश्वासावर  अमेरिकेकडून शिक्कामोर्तब झाले. मा.मोदींचा हा अमेरिका दौरा प्रचंड यशस्वी ठरला नसता तरच नवल.

   शिशीर  सिंदेकर, 9890207692
 [email protected]
(लेखक आर्थिक विषयाचे अभ्यासक आहेत)