चंद्रशेखर जोशी
जळगाव : या देशातील व्यक्ती अन् व्यक्ती एकाच ध्येयाने झपाटलेली दिसते ते म्हणजे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावयाचे आहे. यासाठी वाद, गैरसमज दूर सारून रक्षा खडसेंना खासदार करण्यासाठी नव्हे तर मोर्दीना पंतप्रधान करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन करून काम केले नाही, असे विरोधक म्हणतात; ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर त्यांनी कोणत्या योजनांचा लाभ घेतला हे आपण दाखवून देऊ, असे सडेतोड आव्हान खासदार रक्षा खडसे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.मुक्ताईनगरजवळील कोथळी गावात आपल्या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांनी ‘तरुण भारत’शी संवाद साधला.
प्रश्न: केवळ हायमस्ट लॅम्प सारखी किरकोळ कामे आपण केलीत, असा आरोप विरोधक करत असतात ?
रक्षा खडसे: विरोध करणे, आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. ते त्यांनी करावे, पण अगोदर माहिती घ्यावी. हायमस्ट लॅम्प आपण बसविले याला आपण तर काम म्हणत नाही. ती जनतेची गरज आहे. ही मंडळी आज ज्या चौपदरी महामार्गावरून चालते प्रवास करते ते कोणी केले; यासह बरेच राज्य मार्ग, रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले. आमचे पंतप्रधान सांगतात ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने आम्ही अनेक कामे केली आहेत. त्याची फळे ही जनता चाखते आहे, मग कामे केली नाहीत. असे म्हणूच कशी शकते ही मंडळी, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रश्न : शेती व शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, असा एक आरोप होत असतो ?
रक्षा खडसे: आरोप करणे सोपे, पण सिद्ध करणे अवघड आहे. आज शासकीय योजनांचे अनुदान अनेकांनी घेतले, त्यात ही आरोप करणारी मंडळींही आहे. आमच्या पंतप्रधानांनी जी कामे केली त्याला तोड नाही. या मंडळींनी अनुदान किती व कसले घेतले हे आपण दाखवून देऊ शकतो, पण यात आपल्याला जायचे नाही, त्यांना त्यांचे काम करू द्या, मी माझे काम केले व करत राहणार केळी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक त्यासाठी वेळोवेळी मदत केली. महामार्गाचे अनेक प्रश्न सोडविले, हे या मंडळींना दिसत नाही काय? असा सवालही त्यांनी केला.
प्रश्न: नाथाभाऊ पुन्हा भाजपत येणार असे सांगितले जाते, याचा मुहूर्त कधी?
रक्षा खडसे: हो नाथाभाऊ लवकरच पक्षात येतील. ते मूळचे भाजपचेच. एक विचार घेऊन ते मागीक्रमण करत असतात. केंद्रीय नेतृत्व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्यासह सर्वांच्या सहमतीनेच हा निर्णय होईल.
प्रश्न: आपल्यास उमेदवारी मिळाल्यावर काही जण नाराज झाले तर काहींनी राजीनामे दिले याबाबत काय सांगाल ?
रक्षा खडसे: आपत्यास उमेद्वारी मिळावी, असा विचार पक्षातील अन्य व्यक्तींनी करणे चुकीचे नाही, त्यांचा तो हक्क आहे. पण ही सर्व नाराजी आता नाही. आमचे नेते गिरीशजी महाजन यांनी सर्वांची समजूत घातली व सर्वांकडून आज आपणास मदत होत आहे, त्यामुळे यशाची खात्री आहे.
प्रश्न: श्रीराम पाटील यांचे आव्हान आपल्यापुढे आहे, असे बोलले जाते याबाबत काय सांगाल?
रक्षा खडसे : आपण निवडणुकीकडे निवडणुकीच्याच नजरेने बघतो. कुणालाही कमी लेखत नाही. ही मंडळी जातीच्या समीकरणांचा विचार करतात आणि आम्ही विकासाचा विचार करतो. ते मराठा आणि मी लेवापाटील असा जातीभेद या मंडळींप्रमाणे आम्ही करत नाही. ग्रामीण भागात फिरताना एकच दृश्य दिसते जनता रक्षा खडसेपेक्षा नरेंद्र मोदींकडे बघतेय… अगदी प्रत्येकाला मोदीजी हेच पुन्हा पंतप्रधान हवे आहेत. त्यामुळे कोणी कोणतीही समीकरणे लावू द्या, विजय हा मोदी विचारांचाच होणार आहे, याचा मला विश्वास असल्याचेही त्या शेवटी म्हणाल्या.
प्रश्न: भविष्यात कोणत्या प्रश्नांना आपले प्राधान्य असेल?
रक्षा खडसे: केळी उत्पादकांच्या अनेक समस्या आपण पूर्वी सोडविल्या आहेत. त्यांच्या प्रश्नांना भविष्यातही प्राधान्य देऊ. अंकलेश्वर महामार्गाचा प्रश्न अंतिम टप्यात आहे, त्याताही प्राधान्य असेल. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान कसे होईल यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत आलोय आणि भविष्यातही तसे काम करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.