मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सेंसेक्स प्रथमच 77 हजाराच्या पार

 ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा या पदाची जबाबदारी स्वीकारली. या सगळ्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारावर पाहायला मिळाले. सेंसेक्स पहिल्यांदा ७७ हजारांच्या पार पोहोचले आहे. 

विक्रमी उच्चांकी बाजार सुरु झाला

सोमवारी शेअर बाजार उघडताच त्याने विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्सने नवा विक्रम केला. त्याचवेळी निफ्टीने २३,००० चा आकडा पार केला. तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्याने शेअर बाजारात उत्साह संचारला होता, सेन्सेक्सने प्रथमच ७७,००० चा टप्पा पार केला असून ऐतिहासिक शिखर गाठले आहे. सोमवार, १० जून रोजी बाजार उघडल्यानंतर, बीएसई सेन्सेक्स ७७,०७९.०४ या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. तर निफ्टीने २३,४११.९० ची पातळी गाठली.

सोमवारी बाजार उघडल्यानंतर बँक निफ्टीने ५०,००० चा टप्पा पार केला. बँक निफ्टी ५१,१३३.२० च्या सार्वकालिक उच्चांकापासून काही अंतरावर आहे. तर बँक निफ्टी ५०,२५२.९५ च्या वरच्या पातळीसह व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील सुरुवातीच्या वाढीनंतर बीएसईचे बाजार भांडवल ४२५.३९ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

बाजार उघडताच हे शेअर्स वाढले 

अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, कोल इंडिया आणि श्रीराम फायनॅन्समध्ये बाजार सुरु होताच सर्वोत्तम बदल पाहायला मिळाले. तर टेक महिंद्रा, इंफोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, एलटीआय माइंडट्री आणि हिंडाल्कोमध्ये घसरण पाहायला मिळाली.

कशी असेल शेअर मार्केटची पुढील वाटचाल

प्रमुख देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक डेटाद्वारे बाजाराचा दृष्टिकोन निश्चित केला जाईल. भारतातील डब्ल्यूपीआय महागाई, चीनमधील सीपीआय महागाई, ब्रिटनमधील जीडीपी डेटा, अमेरिकेतील सीपीआय डेटा आणि यूएस फेडरल रिझर्व्हचा व्याजदरांबाबतचा निर्णय यावरून बाजाराची भविष्यातील दिशा ठरेल, असे ते म्हणाले. येत्या काही दिवसांत बाजारातील अस्थिरता कमी होण्याची शक्यता आहे.