एक्झिट पोलच्या निकालानंतर मोदी ॲक्शन मोडमध्ये, बैठकीत 100 दिवसांचा अजेंडा ठरवणार, ईशान्य भारताविषयी महत्त्वाची चर्चा

लोकसभा निवडणुकीसाठीचे एकूण सात टप्प्यांतील मतदान आता संपले आहे. आता सर्वांना ४ जून रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान वेगवेगळ्या माध्यम संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजप सरस ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एक्झिट पोलच्या या पुरक अंदाजानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कामाला लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरच्या १०० दिवसांचा प्लॅन तयार केला आहे.

आज बोलावल्या एकूण सात बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकूण सात बैठका घेणार आहेत. या बैठकांत इशान्य भारतात आलेल्या वादळावर चर्चा होणार आहे. या वादळाच्या अनुषंगाने काय तयारी चालू आहे, काय काम केलं जातंय यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

१०० दिवसांच्या मास्टर प्लॅनवर काम
मिळालेल्या माहितीनुसार सरकारमध्ये पुन्हा एकदा आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत करावयाच्या कामांबाबत ते एक मास्टर प्लॅन तयार करणार आहेत. त्यासाठी तयारीदेखील चालू झाली आहे. त्याच अनुषंगाने मोदी यांच्या एकूण सात बैठकांना आता महत्त्व आले आहे.