जळगाव : येथील केज एन पॉट पेट शॉपचे चालक नितीन अनंत बापट यांच्या बळीराम पेेठेतील निवासस्थानी ‘दिवाळी फराळाला घरी या, स्नेह सुसंवाद वाढवू या!’ हे ‘तरुण भारत’चे अभियान रविवारी सकाळी राबविण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील, तसेच गायनासह विविध अंगांनी कलावंत असलेल्या प्रत्येक सदस्याने आपण राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. महिन्यातून किमान एक वेळा एकत्र येऊन विचारविनिमय करण्यावर ’म्युझिक रसिक ग्रुप’च्या ह्या कार्यक्रमात सर्वांमध्ये एकमत झाले. जळगावकरांसाठी काय करता येईल? यावरही फराळ करता करता चर्चा झाली.
यांची होती उपस्थिती
‘दिवाळी फराळाला घरी या, स्नेह सुसंवाद वाढवू या!’ या ‘तरुण भारत’च्या अभियानाचे समन्वयक, अग्रवाल समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा संपर्क फाऊंडेशनचे विश्र्वस्त डॉ. सुरेश अग्रवाल, वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी तथा गायक, तबला वादक नीळकंठ कासार, सर्जना मीडिया सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष तथा उद्योजक रवींद्र लढ्ढा, ‘दिवाळी फराळाला घरी या, स्नेह सुसंवाद वाढवू या!’ या ‘तरुण भारत’च्या अभियानाच्या समन्वयक तथा ‘बॉक्स ऑफ हेल्थ क्लब’च्या माध्यमातून विविध शाळांमध्ये मुलींसाठी स्तुत्य उपक्रम राबविणार्या सुधा काबरा, व्यावसायिक, कलावंत तथा ‘श्रीमद् भागवत’ या विषयावर चित्रपट बनवित असलेले शरद पांडे, न्यू इंडिया इन्शुरन्समधून सेवानिवृत्त झालेले मिलिंद भांडारकर, निवृत्त व्यावसायिक नंदू पाटील, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनवणे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे पीयूष रावल, ‘जळगाव तरुण भारत’चे युनिट हेड चंद्रशेखर जोशी, व्यावसायिक विशाल भावसार, सेवानिवृत्त सहायक फौजदार अरुणकुमार जोशी, सेवानिवृत्त रेल्वेस्टेशन मास्तर जे. पी. स्वर्णकार, सेेवाभावी तथा व्यावसायिक नितीन अनंंत बापट, उज्ज्वल स्पाऊटर इंटरनॅशनल स्कूलचे प्रवीण गगडानी, रवींद्र मोराणकर आदी उपस्थित होते.
कोरोना काळातही निस्पृह सेवा
‘संपर्क फाऊंडेशन’चे विश्र्वस्त डॉ. सुरेश अग्रवाल यांनी, कोरोना काळातील कार्याची माहिती दिली. त्या काळात कुटुंबातील सदस्यही एकमेकांपासून दुरावले होते, त्यावेळी ‘संपर्क फाऊंडेशन’ने केलेल्या निस्पृह सेवेची आणि आजही ते राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाल्या आणि त्या चर्चांच्या नंतर पुढील ठराव करण्यात आले. ही अशीच भेट व बैठक रविवार, 6 नोव्हेंबर रोजी करण्याचे ठरले. ही बैठक शरद पांडे यांच्या पहिल्या माळ्यावरील हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता घेण्याचे निश्र्चित झाले. त्या बैठकीत ‘बॉक्स ऑफ हेल्थ क्लब’च्या प्रेरणास्थान सुधा काबरा या मार्गदर्शन करतील. पुढील बैठकीत एकेका सदस्याने प्रत्येकी पाच-पाच जण आणावेत, असेही आजच्या चर्चेत ठरले.
पुढच्या दिवाळीत हा ग्रुप वाढलेला असेल आणि त्याचे स्वरुपही बदललेले असेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक सदस्य आपण राबवित असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देतील. कोणाला उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी नितीन बापट (9225712954) यांच्याशी संपर्क साधावा, असे शरद पांडे यांनी सांगितले.
दिवाळी फराळ उपक्रमाची माहिती आणि फोटो ‘तरुण भारत’साठी 9922438396 या व्हॉटसऍपवर पाठवावेत. त्यांना योग्य ती प्रसिद्धी देण्यात येईल.