म्हसावदजवळ विदेशी मद्याचा ५ लाखाचा साठा जप्त !

शहादा : अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या बोलेरो पिकअप वाहनाला म्हसावद पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनात 5 लाख 28 हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहे. लगतच्या मध्यप्रदेश सीमेतून म्हसावद व शहादा मार्गे गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मद्याची अवैध तस्करी केली जाते. पोलिसांच्या या कारवाईने हे सिद्ध झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी म्हसावद पोलिसांनी एक बोलेरो पिकअप वाहन (क्र. क्र.एमएच-14-सीपी-4092) या वाहनात अवैधरित्या विदेशी दारू भरुन शहादा, वडगाव जावदा तह मार्गे भमराटा नाक्याकडे जात असताना पकडली. या वाहनात 5 लाख 28 हजार रुपये किमतीचे खाकी रंगाचे पुठ्याचे एकुण 200 बॉक्स, सोम पॉवर 1000, सुपर स्ट्राँग बियर स्टोन, असा मद्यसाठा आढळून आला. वाहन चालक कोमलसिंग तारसिंग भिल (45) रा. पळासनेर ता. शिरपूर जि. धुळे यास सदर मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मालाचा परवाना व माल वाहतुकीचा परवाना सादर केला नाही.

परिणामी अवैधपणे दारु वाहतूक करीत असल्याबाबत खात्री झाल्याने म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकअप वाहनासह एकुण 10 लाख 28 हजार रुपये दारु व वाहनासह जप्त करण्यात आले आहे. याकामी पो.कॉ.घनश्याम सूर्यवंशी, अजित गावित, प्रल्हाद राठोड, राकेश पावरा, उमेश पावरा यांनी कार्यवाही केली. पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अजित गावित करीत आहेत.