“यंदा लाडक्या बहिणी मतदानाची टक्केवारी वाढवतील”; देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य

#image_title

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदानाला येणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या विशेष असून लाडक्या बहिणींचा उत्साह दिसून येत आहे. सकाळी सात ते नऊ या पहिल्या टप्प्यात साधारण वेग पाहायला मिळाला परंतु साडेदहा वाजेनंतर मतदारांच्या रांगा वाढू लागल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासमवेत नागपुरात मतदान केले. यावेळी त्यांच्या आई सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस ह्या उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांनी मी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून ते आपलं कर्तव्य आणि आपला अधिकार देखील आहे. आज कुटुंबासोबत मतदान केल आहे. महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की सर्वांनी मतदान करावे. लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे. तसेच लोकसभेत ज्या याद्यांमध्ये घोळ होता, तो काही प्रमाणात दूर झालेला आहे. वोटिंग सिस्टीम लोकसभेत स्लो होती त्याच्यात आता इम्प्रूमेंट झालं आहे. लोकसभेसारखं ऊन आज नाहीये, त्यामुळे निश्चित टक्का वाढेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांची संख्या 5 ते 6% ने पुरुषांपेक्षा कमी आहे. महिला मतदान करून ही टक्केवारी भरून काढतील. जनतेचे प्रेम मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं, प्रेम मिळताना दिसून येत आहे, त्यामुळे चेहऱ्यावर हास्य आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.