‘या’ अपघातानंतर आता रामदेववाडी अपघातही चर्चेत; गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

जळगाव : पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कारने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, १८ रोजी मध्यरात्री घडली होती. दरम्यान, या प्रकरणात राजकीय दबावाचा आरोप झाला होता. या घटनेची चर्चा आता राज्यात नव्हे देशात होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवार, ७ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, चार जणांचा मृत्यू झाल्यानंतरही या घटनेतील आरोपींना अटक होत नसल्याने राजकीय दबाव असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला होता. त्यावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले आहेत गुलाबराव पाटील ?
पुण्याच्या आणि जळगावच्या घटनेचा विचार केला तर दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आहे. मात्र आपण जळगावच्या अपघातानंतर सर्वात आधी ३०४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे एका आरोपीला लोकांकडून जास्त मार लागला. त्यानंतर उपचाराची आवश्यकता असल्यामुळे मेडिकल फिटनेस नसल्यामुळे अटक करता येत नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, दोषींवर कारवाई करावी असे आदेश आपण पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत त्याचा अहवाल लवकर येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी मला दिला आहे.

अपघात झाला त्या दिवशी मृतांच्या नातेवाईकांचा संपर्कात होतो. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाले, त्या दिवशी जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. अपघाताबाबत जे सर्वोच्च कलम असते ते म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि माझा काही एक संबंध नाही. जे जे करता येत ते सर्व करण्याचा आपण प्रयत्न केला.

आरोपी माझे नातेवाईक नाही. मात्र ज्या चार जणांचा मृत्यू झाला ते माझ्या मतदारसंघातले आहेत. त्यामुळे या प्रकरणात शेवटपर्यंत मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न करत राहणार आहे. वैद्यकीय कारणामुळे आरोपींना अटक करता येत नव्हती. मात्र तरीसुद्धा आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत आदेश मी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.