युपीआयनंतर आता ‘युएलआय’; ग्राहकांना सुलभरित्या कर्ज मिळण्यासाठी आरबीआयचा तंत्रज्ञानाधारित प्रोजेक्ट

युपीआयनंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने युनिफाईड लेंडिंग इंटरफेस(युएलआय) सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. युएलआयच्या माध्यमातून ग्राहकांना बँकांकडून सुलभरित्या कर्ज मिळणार आहे. दरम्यान, जन धन-आधार, युपीआय आणि युएलआयची ‘नवीन त्रिमूर्ती’ भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासात एक क्रांतिकारी पाऊल असेल.

“यापुढे आरबीआयकडून नव्या प्लॅटफॉर्मला युनिफाइड लेंडिंग इंटरफेस(युएलआय) असे नाव देण्यात आला आहे, असे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बेंगळुरू येथील कार्यक्रमात सांगितले. युएलआय प्लॅटफॉर्म विविध राज्यांच्या जमिनीच्या नोंदीसह, एकाधिक डेटा सेवा प्रदात्यांकडून कर्जदारांपर्यंत डिजिटल माहितीचा अखंड आणि संमती-आधारित प्रवाह सुलभ करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास गव्हर्नर दास यांनी व्यक्त केला आहे.

वित्तीय सेवांतील डिजिटलायझेशनच्या यशामुळे प्रोत्साहित होऊन आरबीआयने विशेषत: लहान आणि ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सुलभ कर्ज प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी युएलआय लाँच करणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने दोन राज्यांमध्ये सुलभ कर्जे सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा पायलट प्रकल्प सुरू केला होता.

जन धन-आधार, युपीआय आणि युएलआयचे ‘नवीन त्रिमूर्ती’ देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासात एक क्रांतिकारी पाऊल ठरेल यावर दास यांनी भर दिला. युपीआय, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)द्वारे एप्रिल २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या रिअल-टाइम पेमेंट सिस्टमने देशातील किरकोळ डिजिटल पेमेंटच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही गव्हर्नर दास यांनी नमूद केले.