युपीतील तरुणाला जळगावात चाकू लावून लुटले, पोलिसांनी दोघा आरोपींना…

जळगाव : चटई कामगाराला लुटणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अखेर आरोपींना गज्याआड केले आहे.

युपीतील रहिवासी असलेला तरुण जळगावात चटई कंपनीत कामाला आहे. शनिवार, 17 जून रोजी सकाळी नऊ वाजता तक्रारदार जितेंद्रसिंग राम मोर्या (22, अहमददेव नागर, पटियाली, जि.कासगंज, उत्तरप्रदेश) हा तरुण मूळ गावी जाण्यासाठी कुसूंबा नाक्यावरून बसल्यानंतर त्यास अजिंठा चौकाऐवजी मेहरुण तलावाकडे नेत चाकू लावून लुटण्यात आले होते. संशयित रीक्षा चालकासह साथीदाराने 15 हजारांचा मोबाईल व एक हजारांची रोकड लूटल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या-त्या भागातील सीसीटीव्ही तसेच संशयिताच्या वर्णनाद्वारे खबर्‍यांमार्फत ओळख पटवून संशयित निष्पन्न केले.

संशयित आयुष सुवर्णसिंग तोमर आणि पवन निवृत्ती लोहार (दोघे रा.श्रीकृष्ण नगर, कुसूंबा. ता.जळगाव) यांना अटक करण्यात आल्यानंतर संशयितांनी गुन्हा कबूल करीत मोबाईल काढून दिला तसेच गुन्ह्यात वापरलेली रीक्षा जप्त करण्यात आली. संशयिताना न्या.सुवर्णा कुलकर्णी यांनी 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. निखील कुलकर्णी यांनी बाजू मांडली. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, एएसआय अतुल वंजारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, साईनाथ मुंढे आदींनी केली. संशयितांच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.