युवक आणि राजकारण

प्रभू रामचंद्र जेव्हा विश्वामित्र ऋषींसोबत त्यांच्या यज्ञाचे रक्षण करायला गेले त्यावेळेला त्यांनी नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले होते. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळेस किंवा कंसाच्या अत्याचारांपासून जनतेला मुक्त केले असेल त्यावेळेस ते काही जास्त व्याचे नव्हते. सिकंदराच्या सैन्याशी लढाई करणारा चंद्रगुप्त हा एक युवकच होता. महाराणा प्रतापांनी अकबराशी लढण्याची प्रतिज्ञा वयाच्या १६ व्या वर्षी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा वयाच्या १६ व्या वर्षी केली. हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारा बाजीराव पेशवा हा केवळ २० व्या वर्षीच पेशवा बनला होता. यावरून असे लक्षात येते की, अगदी तरुण व्यामध्ये आपल्या देशातील महापुरुषांनी मोठी कामगिरी सिद्ध करून दाखविली आहे.

परंतु आजचा तरुण हा एकतर पुस्तकी किडा बनलेला असतो किंवा त्याचे देशाच्या समाजाच्या परिस्थितीवर फार कमी लक्ष असते. एकतर त्याचे करीअरवर खूप जास्त लक्ष असते किंवा तो युट्युब, इन्स्टाग्राम, पब्जी यामध्ये हरवलेला असतो. जो तो शहरांमध्ये कुठे छोटी-मोठी नोकरी मिळेल का, याच्या शोधामध्ये फिरत असतो. भारत तरुणांचा देश आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाची जी सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे ती म्हणजे तरुण युवक यांनी जर आपल्या भविष्याचे रिमोट कंट्रोल भलत्या कोणाच्याही हातात दिले तर ते योग्य ठरणार नाही व त्याचा वाईट परिणाम त्यांच्याच भविष्यावर होईल. आता २०२४ च्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी देशभरातील जवळपास दोन करोड युवा मतदार नव्याने जोडले गेलेले आहेत. महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या पृष्ठभूमीवर तरुण शक्तीकडे देशाचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. तरुणांनी आता एका विकसित भारताचे स्वप्न पाहायला हवे. स्थानिकांना रोजगार व नवीन नोकऱ्या मिळाव्या असे जर वाटत असेल तर भारतात पुन्हा एकदा स्थिर सरकार देणे ही भारतीय नागरिकांची प्राथमिकता असली पाहिजे.

पूर्वीच्या काळी अशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणावर होते. आता नवीन सुशिक्षित मतदारांची भर पडलेली आहे. पूर्वीच्या काळी लोकांनी रस्ते पाहिलेले नव्हते. परंतु आता नवीन तरुणांनी चार पदरी महामार्ग, सहा पदरी महामार्ग आणि समृद्धी महामार्गासारखे रस्ते पाहिलेले आहे. आजच्या तरुणांनी चंद्रावर भारतीय चांद्रयान यशस्वीरीत्या उतरताना पाहिलेले आहे. त्यामुळे आताचा तरुण हा जुन्या समस्याग्रस्त भारतात राहणारा तरुण नाही तर तो प्रगतिशील भारतात राहणारा तरुण आहे. त्यामुळे तरुणाला आपल्या अपेक्षा पूर्ण करेल असे सरकार आणणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक तरुणाला असे वाटते की, माझ्या गावांमध्ये चांगले रस्ते असायला पाहिजे. पिण्याचे शुद्ध पाणी असायला पाहिजे. शाळा-कॉलेजेसची सोय असायला पाहिजे. परंतु त्यासाठी पुढाकार कोण घेणार? आंदोलन कोण उभे करणार? लोकप्रतिनिधींच्या मागे कोण लागणार? तर, ही कामे दुसन्या कुणीतरी केली पाहिजे असे त्याला वाटते आणि मी मात्र नोकरीच्या शोधामध्ये कुठेतरी फिरलं पाहिजे.

आज खेड्यापाड्यातील सर्व तरुणांची धाव शहराकडे असते. शहराकडे का बरं जायचे आहे तर त्याचे कारण म्हणजे शहरांमध्ये रोजगार असतो. रोजगार का बरे निर्माण झाला? कारण शहरांमध्ये मोठमोठ्या कंपन्या असतात. मोठमोठ्या कंपन्या शहरामध्ये का आल्या? कारण शहरांमध्ये रस्ते, रेल्वे इत्यादी दळणवळणाची साधने होती म्हणून. ही साधने का बरे निर्माण झाली? तर आमचे गाव, आमचे शहर हे चांगले झाले पाहिजे, इतर ठिकाणी ज्या सोयी-सुविधा आहे त्या आमच्याही शहरामध्ये आल्या पाहिजेत यासाठी तेथील नागरिक आग्रही होते म्हणून गुंतवणूकदारांना किंवा कंपन्यांना इथे यावंसं वाटलं पाहिजे आणि त्यांना इथे केव्हा पावसं वाटेल? रस्ते, वीज, पाणी आणि कुशल मनुष्यबळ या सुविधा उपलब्ध असेल तर कंपन्यांना यावंसं वाटेल. या सर्व सोयी-सुविधा शहरांमध्ये पूर्वी होत्या का? तर, उत्तर ‘नाही’ असे आहे. त्या हळूहळू होत गेल्या. कशा होत गेल्या? तर, इथे राहणाऱ्या लोकांनी व जनप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर या सर्व सोयी झाल्या.

तरुणांसमोर दोन प्रकारचे पर्याय आहेत. एक म्हणजे आमच्याही गावात आवश्यक त्या सोयी-सुविधा कशा उभ्या राहतील? यासाठी समाजमन, जनमानस कसे तयार होईल? पासाठी तरुणांनी पुढाकार घेणे व त्या सगळ्या सोयी-सुविधा आपल्या गावामध्ये उपलब्ध करून घेणे आणि दुसरा पर्याय म्हणजे खुशाल गाव सोडून निघून जाणे जिथे कुठे नोकरी मिळते ती करणे. गाव सोडून निघून जात असताना मात्र आम्ही आमच्या गावाचा विकास का झाला नाही, हा प्रश्न कोणालाही विचारू शकणार नाही. आज संपूर्ण देशामध्ये नोकरीच्या निमिताने विस्थापित होणान्यांची संख्या खूप जास्त आहे. ज्यांच्यामध्ये काही ना काही कला कौशल्य आहे ते तरुण स्वतःच्याच गावामध्ये, तालुक्यामध्ये आपला रोजगार उभा करू शकतात.जो रोजगार महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकला तो रोजगार बिहारमध्ये का निर्माण झाला नाही? तो उत्तरप्रदेशमध्ये का निर्माण झाला नाही? तर याचे उत्तर आहे उद्योगाला अनुकूल असलेली व्यवस्था निर्माण न करणे आणि जनप्रतिनिधींची अकार्यक्षमता.

तसेच लोकांच्या मनात विकासाबद्दल जागरूकता नसणे, आज उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये मोठमोठे उद्योग उभे होत आहेत. त्यामुळे या राज्यातील मनुष्यबळाचे स्थलांतर कमी होत आहे. गुजरात राज्य एवढे प्रगतिपथावर कसे गेले? तेथे खेड्यापाड्यांमध्ये रस्ते कसे झाले? नद्यांची जोडणी कशी झाली? वाळवंटामध्ये पाणी पोहोचून तेथे शेती कशी सुरू झाली? भारतातील सगळेच मोठे ब्रॅण्ड आणि मोठ्या कंपन्या गुजरातमध्ये हजेरी लावतात. हे सर्व कसे काय झाले? याला उत्तर एकच आहे ते म्हणजे राजकीय प्रतिनिधींची महत्त्वाकांक्षा असणे व जनता समाजमन विकासासाठी तयार असणे हे होय. यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुणांनी शपथ घेतली पाहिजे की, आम्ही शंभर टक्के मतदान करू जातिपातीच्या कुठल्याही भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. आजच्या १८ वर्षाच्या युवकाला त्याच्या लहानपणापासून विकासाची  काही फळे चाखायला मिळालेली आहे. परंतु भारताला विकासाचे केंद्रबिंदू बनवायचे असेल तर तरुणांनी आता आपला सहभाग देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते

अमोल पुसदकर
९५५२५३५८१३
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)