युवक, दाम्पत्याला बेदम मारहाण; वृध्द महिलेच्या पिशवीतून रोकड लंपास, जळगावात काय काय घडलं ?

जळगाव : दिलेले उसने पैसे मागितले म्हणून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. भुसावळ शहरातील ढाके गल्लीत सरोदे दाम्पत्याला एका महिलेने शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले. तर जळगाव शहरातील महाराष्ट्र बँकेतून एका वृध्द महिलेच्या पिशवीतून अज्ञातांनी २० हजार ४०० रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

उसने पैसे मागितले म्हणून युवकाला मारहाण
जळगाव शहरातील प्रताप नगरात दिनेश मांगिलाल ओझा (२५ ) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. केर्टस चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. दिनेश याने नंदकिशोर रामगोपल तिवारी (रा. उस्मानिया पार्क जळगाव) याला उसनवारीने २ लाख रूपये दिलेले आहेत. दरम्यान बुधवार, १८ रोजी नंदकिशोर याच्यासोबत गप्प मारत असताना दिनेशने ‘मी तुला दिलेले २ लाख रूपये लवकर परत कर’, असं सांगितलं. या रागातून नंदकिशोर रामगोपाल तिवारी, कैलास देविलाल उपाध्ये रा. पटेल नगर, जळगाव आणि राहूल पाटील रा. राजाराम नगर, जळगाव या तिघांनी दिनेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दिनेश याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दाम्पत्याला मारहाण
भुसावळ शहरातील ढाके गल्लीत निलीमा किरण सरोदे (४२) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. गुरूवार, १९ रोजी सकाळी १० वाजता गल्लीतील मनिषा उर्फ संगिता संतोष फालक या महिलेने निलीमा सरोदे यांना व त्यांचे पती किरण सरोदे यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केले. या प्रकरणी निलीमा सरोदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मनिषा उर्फ संगीता संतोष फालक रा. ढाके गल्ली, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सिमा चौधरी हे करीत आहेत.

वृध्द महिलेच्या पिशवीतून रोकड लंपास
जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयाच्या समोर असलेल्या महाराष्ट्र बँकेत गुरूवार, १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मिराबाई भाऊराव चौधरी (७४ रा. सप्तश्रृंगी नगर, जळगाव) या वृध्द महिला कामाच्या निमित्ताने आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळील पिशवीतील २० हजार ४०० रूपयांची रोकड चैन उघडून चोरून नेल्याची घटना घडली. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने सर्वत्र चौकशी केली परंतु, कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत त्यांनी  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहेत.