रक्षक बनला भक्षक! शारीरीक सुखाची मागणी अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

धुळे: धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा देवपूर पोलिसात दाखल करण्यात आला असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी रविवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याने पोलीस दलाची अब्रु वेशीला टांगली गेली आहे.

अधीक्षक म्हणाले, निरीक्षक पाटील यांनी महिलेला धमकावून अश्लील प्रकारचा व्हिडिओ तयार केला व नंतर हा व्हीडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. गंभीर प्रकारचा गुन्हा पोलीस दलातील अधिकाऱ्याने केल्याने त्यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. संशयित पाटील यांच्या शोधार्थ धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह धुळे शहर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असल्याचेही पोलीस अधीक्षक म्हणाले.

शारीरीक सुखाची मागणी, अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

सन 2022 ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान निरीक्षक हेमंत पाटील यांनी पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच अश्लील वक्तव्य करीत महिलेला कपडे काढण्यास भाग पाडून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली व व्हिडिओदेखील व्हायरल केला. याबाबत वाच्यता केल्यास तुझे मरण जवळ आले आहे, अशी धमकी निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या साथीदारांनी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड म्हणाले की,कुणीही महिला व मुलीवर भीती दाखवून अन्याय-अत्याचार केल्यास असल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, दोषींची हयगय केली जाणार नाही, असेही बारकुंड म्हणाले.