बोदवड : जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील 53 हजार 449 हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देवून योजनेचे काम पूर्ण करावी, अशी अपेक्षा या परिसरातील शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. रक्षा खडसे सलग तिसर्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या असून त्यांची केंद्रात मंत्री पदी वर्णी लागल्याने त्यांच्याकडून आता मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
प्रतिभाताईंच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्ह्यातील 33 हजार 668 हेक्टर आणि बुलडाणा जिल्ह्यातील 19 हजार 781 हेक्टर क्षेत्राला बोदवड उपसा सिंचन योजनेचा लाभ होणार आहे. सन 2011 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते.
दोन टप्प्यात योजना नियोजित
बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे काम दोन टप्प्यांमध्ये नियोजित आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील पंपगृह अ, पंपगृह ब, जुनोने साठवण तलावाचे 301.00 मी. तलावापर्यंतचे काम उद्धरण नलिकेची एक रांग ही कामे पूर्ण करून 14,994 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली जाणार आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून 2012 मध्ये एकरकमी 500 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले होते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 14 हजार 994 हेक्टर दुसर्या टप्प्यात 38 हजार 455 हेक्टर जमिनीवर सिंचनाचा लाभ मिळणार असून यात जिल्ह्यातील बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्याला लाभ होणार आहे.
अशी असेल योजना
मुक्ताईनगरजवळ तापीचे बॅकवॉटर असलेल्या पूर्णा नदीच्या काठी खामखेडा येथे इंटेक चॅनल जॅकवेल बांधले जाईल. जॅकवेलमधून पाणी उपसा करून जॅकवेलपासून 2500 मिमीच्या दोन पाइपलाइनद्वारे पहिल्या टप्प्यात जुनोने येथे साठवण तलावात पाणी सोडले जाईल. दुसर्या टप्प्यात 1850 मिमी व्यासाच्या पाईप लाईनद्वारे जामठी येथे साठवण बंधार्यात पाणी सोडले जाईल. दोन्ही ठिकाणी मातीचे साठवण बंधारे बांधणे प्रस्तावित आहे. साठवण बंधार्यांमधून जळगाव जिल्ह्यातील 63 टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील 37 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येईल. बंधार्यांमधून बंद पाइपलाइनद्वारे शेतापर्यंत पाणी वितरित होणार आहे.
पाच तालुक्यातील 101 गावांना योजनेचा लाभ
शेतकर्यांसह कष्टकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी 1997 मध्ये या योजनेला प्रशाकिय मान्यता मिळाली. यावेळी 522 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या योजनेंतर्गत 42 हजार 420 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून बोदवड तालुक्यातील सर्वाधिक 43 गावे, मुक्ताईनगर तालुक्यातील चार गावे, जामनेर तालुक्यातील 14 गावे तर मोताळा तालुक्यातील 15 गावे, मलकापूर तालुक्यातील 23 गावांचा समावेश आहे. पाच तालुक्यातील 101 गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 10 जून 2010 रोजी बोदवड येथे केला होता. या योजनेला निधी अभावी चालना मिळालेली नाही. शेतकर्यांनी आंदोलन, उपोषण करीत मोर्च काढले तर शेतकरी पुत्र अनिल गंगतीरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण शेतकर्यांनी थेट मंत्रालयात पायी मोर्चा काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनही दिले होते.
दुष्काळ तालुका हा शाप मिटण्याची अपेक्षा
केवळ लोकसभा, विधानसभा निवडणूक आली की बोदवड सिंचन योजनेचा मुद्दा ऐरणीवर आणला जातो व निवडणूक आटोपताच हा मुद्दा थंडबस्त्यात जातो, हा गेल्या अनेक वर्षांपासून चाललेला प्रघात आहे. या योजनेच्या पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले असून तीन टप्यात काम होणार आहे. या प्रकल्पाचे पाण्याचे नियोजन म्हणजे हतनूर धरणाचे बुडित क्षेत्रातील पावसाळ्यात पुराचे वाहुन जाणारे पाणी मुक्ताईनगर गावाजवळील खामखेडा पुर्णा नदी काठावरून पंपाद्वारे उचलून आमंदगाव येथील तलावात टाकून पाईप लाईनद्वारे उचलून ठिकठिकाणी तलाव करून शेतीला पुरविणे.
नूतन खासदार व मंत्र्यांकडून अपेक्षा
बोदवड तालुक्याची दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख आहे. सहकार महर्षी स्व.प्रल्हादराव पाटील यांनी मुक्ताईनगर जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी आणले होते व आताच्या खासदार व मंत्री रक्षा खडसे यांनी बोदवड तालुक्याला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढावे व योजनेला गती द्यावी, अशी अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. बोदवड सारख्या दुष्काळ ग्रस्त तालुक्याला जलयुक्त केल्यास व शेतकर्यांच्या शेतात पाणी मिळाल्यास तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.