राजकोट येथे १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा प्लेइंग ११ चा भाग असेल. सामन्याच्या दोन दिवस आधी कुलदीप यादवने रवींद्र जडेजाच्या खेळाबाबत अपडेट जारी केले आहे. कुलदीप यादव म्हणतो की, रवींद्र जडेजाने १२ फेब्रुवारीपासून नेट सराव सुरू केला आहे आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी तो फिट आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सहभागी होऊ शकला नाही.
बीसीसीआयने शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघ जाहीर केला त्याचवेळी रवींद्र जडेजा तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता बळावली होती. मात्र, बीसीसीआयने म्हटले होते की, रवींद्र जडेजाचे खेळणे पूर्णपणे तंदुरुस्त असण्यावर अवलंबून आहे. सामन्यापूर्वी कुलदीप यादवने रवींद्र जडेजाच्या खेळाविषयी माहिती दिली आहे. रवींद्र जडेजाच्या खेळण्याची पूर्ण आशा आहे, असे कुलदीप यादवने सांगितले. जडेजा फिट दिसत आहे. जडेजाने 12 फेब्रुवारी रोजी नेट सत्रातही भाग घेतला होता. मला वाटते की तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा टीम इंडियाचा भाग असेल.