मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार असणार हे निश्चित आहे, दुसरीकडे अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनाच रिंगणात उतरवण्याचे स्पष्ट झाले आहे.पवार कुटुंबातील नणंद भावजय यांच्यातील ही लढत देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक होणार यात शंका नाही.
अजित पवारांनी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळालं होत. आपण काम करतो फक्त सेल्फी काढत फिरत नाही, भाषण करून संसदपटू किताब मिळवल्याने कामे होत नाहीत अशी टीका अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती.
यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत म्हणाल्या, राजकारण हा भातुकलीचा खेळ नसतो. यात नाती नसतात, जबाबदारी असते. काम आणि नाती वेगवेगळ्या जागेवर असतात. मी माझं काम जबाबदारीने करत असते. संसद ही भाषण करण्यासाठीच असते. आमच्यासाठी ही इमारत नसून विचाराचे मंदिर आहे. मोदी निवडून आले तेव्हा ते संसदेच्या इमारतीवर नतमस्तक झाले. या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करण्यासाठीच लोकांनी आम्हाला पाठवलं आहे.
पुढं त्या म्हणाल्या , कुछ रिश्ते दिल से बनते हैं,माझे अनेकांसोबत विश्वासाचे नाते आहे. त्यामुळे भावनिक आव्हानाला काही अर्थ नाही. आमचं सगळं कुटुंब राजकारणात नाहीय. आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता? दादा बोलले असतील तर तुम्ही त्यांनाच विचार, एका व्यक्तीविरोधात ही लढाई नाही. तर भाजपच्या विचाराविरोधात माझी लढाई आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.