राज्यपालांच्या हस्ते प्राचीन भारताच्या मानचित्राचे पूजन

 

पुणे:  16 ऑक्टोबर पुणे येथील नामवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचीन भारताचा अखंड नकाशा थ्रीडी माध्यमातून साकारण्यात आला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना प्राचीन भारताची ओळख व्हावी व आपला देदीप्यमान इतिहास भूगोलातील नकाशाच्या माध्यमातून मुलांच्या नजरेसमोर राहावा या हेतूने शिक्षण प्रसारक मंडळीने या मानचित्राची निर्मिती शाळेच्या प्रांगणात केली. या मानचित्राचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, वझे, शाळा समितीचे अध्यक्ष ऍड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, पराग ठाकूर, सुधीर काळकर उपस्थित होते.

शि.प्र. मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. जैन यांच्या हस्ते राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राज्यपालांनी शाळेचे आणि शि. प्र. मंडळीचे कौतुक केले. अखंड भारत आपण प्रत्यक्षात पाहिला नाही पण नकाशामध्ये मात्र आपण तो आज पाहू शकतो, ते केवळ या शाळेने घेतलेल्या पुढाकारामुळे. आजपर्यंत कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशाप्रकारे अखंड भारताचा नकाशा मी पाहिला नाही, असे त्यांनी नमूद केले. नकाशाद्वारे भारताचा गौरवपूर्ण इतिहास भूगोलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी हर्षिता जोशी हिने केले. तसेच मानचित्राबद्दलची अधिक माहिती वैष्णवी गुळवे हिने उपस्थितांना करून दिली. मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांनी राज्यपालांसह पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

नकाशा संबंधित थोडक्यात माहिती

प्राचीन भारत

15 फूट बाय 10 फूट या आकारात साकारलेला आणि पूर्णतः थ्रीडी असा भारतातील पहिलाच, प्राचीन भारताचा पूर्णाकृती नकाशा पुण्यातील एस. पी. एम. इंग्लिश स्कूलमध्ये लावण्यात आला आहे. शाळेचे अध्यक्ष ऍड. मिहिर प्रभुदेसाई ह्यांच्या संकल्पनेतून व शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांच्या सहकार्याने पुढे आलेला हा प्रकल्प साकारण्यासाठी बकेट डिझाईन या डिझाईन स्टुडिओचे मुख्य डिझाईनर हृषिकेश राऊत व त्यांच्या टीमने चार महिने संशोधन करून सर्व माहिती गोळा केली. ही माहिती नकाशा स्वरूपात मांडायला आणि नकाशाचे निर्मिती करायला तीन महिने लागले. एस. पी. एम. इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांचीसुद्धा या कामात महत्वाची मदत झाली.

थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्यामुळे भारताचा सगळा भूभाग पाहताक्षणी डोळ्यासमोर उभा राहतो. भारत भूचे तिच्या सर्व डोंगररांगा, उंच सखल प्रदेश, घाट, दर्‍या, खोरे, पठारे, नद्या, समुद्र तट यांच्यासकट जसेच्या तसे दर्शन घडते.
या नकाशात भारताचे प्राचीन रूप पाहायला मिळते. इतिहासात झालेल्या वेगवेगळ्या विभाजनांपूर्वी प्राचीन भारतात कोणकोणते प्रदेश समाविष्ट होते आणि त्यांची पूर्वीची नावे या नकाशात पाहायला मिळतात.

या नकाशात प्राचीन भारतातील संस्कृतीच्या खुणा पदोपदी पाहायला मिळतात. महाभारतकालीन 16 महाजन पदे, त्यांची नावे, वेगवेगळी राज्ये आणि प्रदेश या नकाशात दाखवलेले आहेत.

भारताच्या भौगोलिक भू भागाबरोबरच हा नकाशा एकप्रकारे भारताचे सांस्कृतिक मानचित्रदेखील आहे.

या नकाशात समाविष्ट केलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे-

1. सोळा महाजनपदे
2. सप्तसिंधू
3. चारधाम
4. बारा ज्योतिर्लिंग
5. चार आदि शक्तीपीठे
6. सप्त मोक्षपुरी
7. प्राचीन विश्व विद्यालये
8. पर्वत रांगा
9. इतिहासातील साम्राज्ये आणि त्यांचे प्रदेश
10. प्रदेशांची इतिहासातील पूर्वीची नावे
11. शहरांची इतिहासातील पूर्वीची नावे
12. शहरांची आत्ताची नावे
13. राज्यांच्या सीमा रेषा
14. देशांच्या सीमा रेषा
15. राज्यांच्या आणि देशांच्या राजधानीची शहरे
16. कुंभस्थान

मुलांना अनुभवातून बर्‍याच गोष्टी पटकन शिकता येतात, लक्षात राहतात, जसं की विज्ञानाची प्रयोगशाळा, जिथे प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान शिकता येते. हा थ्रीडी नकाशा म्हणजे इतिहास आणि भूगोलाची अशीच एक प्रयोगशाळा आहे जिथे इतिहास आणि भूगोल डोळ्यांना पाहायला मिळतो, प्रत्यक्ष अनुभवता येतो आणि खूप काही शिकायला मिळते आणि पटकन लक्षात राहते.

अशी इतिहास आणि भूगोलाची प्रयोगशाळा प्रत्येक शाळेत असायलाच हवी कारण , भारताचा अभूतपूर्व इतिहास समजून घेतल्याशिवाय आणि त्या इतिहासाची भारताच्या भूगोलाशी सांगड घातल्याशिवाय भविष्यात तयार होणार्‍या विद्यार्थ्यांची भावनिक नाळ भारताशी जोडली जाणार नाही, असे शाळेचे मत आहे.