यावल ः यावल शहरातील कुंभार टेकडी वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतांना यावल पोलिसांना चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली आहे. यात पोलिसांनी शहरातील तब्बल 17 संशयितांना अटक केली असून त्यांनी 37 दुचाकी व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. यावलसह जळगाव जिल्हा तसेच सुरत व अन्य भागातून चोरट्यांनी या दुचाकी लांबवल्याचे तपासात समोर असून चोरीच्या 13 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. दुचाकींची चोरी केल्यानंतर ती एजंटच्यामार्फत विक्री करायचा उद्योग शहरातील तरुण करीत होते व या तरुणांकडून अजून मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, संशयिताना यावल न्यायालयात रविवारी हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ट्रॅक्टर चोरीच्या तपासात टोळी अडकली जाळ्यात
यावल शहरातील कुंभार टेकडी भागातून 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अजय मूलचंद पंडित यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले. याप्रकरणी 18 सप्टेंबर रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे व राजेंद्र पवार करीत असताना त्यांनी अर्जुन सुभाष कुंभार (19, रा.कुंभारवाडा यावल) यास ताब्यात घेतले. त्याने ट्रॅक्टर चोरीत शहरातील चौघे सोबत असल्याचे सांगिले. चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरसह दुचाकीदेखील चोरी केल्याची कबुली दिली. यात काहींचा सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर तब्बल 17 संशयितांची टोळी समोर आली तर एका अल्पवयीनालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
चोरीच्या 13 दुचाकी जप्त
चौकशीत 16 संशयितांनी एक ट्रॅक्टरसह तालुक्यातील विविध गावातून तब्बल 37 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी 13 दुचाकी विविध भागातून हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरीक्षक मुजफ्फर खान, उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पाचपोळे, असलम खान, हवालदार राजेंद्र पवार, सुशील घुगे, योगेश खांडे, संदीप सूर्यवंशी, मोहन तायडे, अशोक बाविस्कर, अनिल पाटील, एजाज गवळी या पथकाने केली.
यावल शहरातील दुचाकी चोरट्यांच्या टोळीत या संशयितांचा समावेश
अटकेतील आरोपींमध्ये अर्जुन सुरेश कुंभार (19 रा.बोरावल गेट, यावल), अशरफ कलिंदर तडवी (19, बोरावल गेट भिलवाडा, यावल), जावेद खान अफजल खान (22, रा.बाबा नगर, यावल), जावेद खान नजीर खान (30, रा.ख्वॉजा नगर, यावल), रवींद्र पंढरी कोळी (40, दहिगाव), सलीम खलील तडवी (24, रा.विरावली, ता.यावल), विशाल दिलीप वाणी (30, रा.फिल्टर हाऊस, बोरावल गेट, यावल), विनोद दौलत कुंभार (24, रा.गायत्री नगर, यावल), उमेश झग्गू घारु (49, रा.फिल्टर हाऊस, बोरावल गेट, यावल), संजय भगवान भोई (30, रा.बोरावल गेट, यावल), हर्षल सदानंद गजरे (20, रा.फिल्टर हाऊस, बोरावल गेट, यावल), रवींद्र सुरेश कुंभार (25, रा.कुंभार वाडा, यावल), आकाश राजू कुंभार (19, रा.कुंभार वाडा, यावल), सुरेश आनंदा कुंभार (52, रा.बोरावल गेट, यावल), सर्फराज समशेर तडवी (22, रा. बोरावल गेट, यावल), राजेश कडू महाजन (38, रा.गणेश नगर, यावल), सागर उर्फ उमेश जितेंद्र सपकाळे (बाहेर पुरा, यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.